सांगली : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री विद्युत बस सेवा योजनेंतर्गत सांगली महानगरपालिकेला विजेवर चालणाऱ्या ५० बस मंजूर आहेत. यासाठी मिरज येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून हा अतिशय चांगला प्रकल्प येथे सुरू होत आहे. याचा शहराचे प्रदूषण कमी होण्यास उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

महानगरपालिका क्षेत्रातील मिरज येथे केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई. बस सेवा योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बसेस परिचलन करण्याकरिता ई-बस सेवा डेपोचे बांधकाम व विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पर्यावरणाची काळजी घेताना सर्व शासकीय कार्यालये सौरऊर्जेवर झाली पाहिजेत. सौरऊर्जा प्रकल्पासाठी शासन अनुदानही देत आहे. आपल्या देशामध्ये तिन्ही ऋतू समान आहेत. याचा फायदा घेऊन नैसर्गिक स्रोताकडे जावे. याच्यातून ई-बसेस सेवेचा आग्रह सुरू झाला आहे. अशा नवनवीन प्रकल्पांना केंद्र व राज्य शासन मदत करण्यास तयार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रास्ताविकात आयुक्त श्री. गुप्ता म्हणाले, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाचे १३ कोटी ५८ लाख रुपये अनुदान मिळेल. पुढील सहा महिन्यांत युध्दपातळीवर काम करून ई-बस सेवा डेपोचे काम पूर्ण करू व इलेक्ट्रिक बसची चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू, या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माजी पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.