scorecardresearch

चंद्रपूर : ॲड. दीपक चटप यास ब्रिटीश सरकारची ४५ लाखांची शिष्यवृत्ती

देशातील पहिला तरुण वकील; उच्चशिक्षणासाठी लंडनला निवड

Adv dipak chatap

दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील ॲड. दीपक यादवराव चटप हा तरुण वकील ब्रिटीश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’ ठरला आहे. ब्रिटीश सरकारतर्फे देण्यात येणारी ‘चेव्हेनिंग’ ही जागतिक प्रतिष्ठेची ४५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती त्याला मिळाली. तो अवघ्या २४ व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील ठरला आहे.

सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकारकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. लंडनच्या ‘सोएस’ या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपकची निवड झाली आहे. त्याच्या शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ब्रिटीश सरकारने घेतली आहे.

लखमापूर (ता.कोरपना, जि.चंद्रपूर) येथील रहिवासी असलेला दीपक ‘पाथ’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक आहे. या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे विधायक काम करत आहे. शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप, पद्मश्री डॉ.अभय बंग, विधिज्ञ असीम सरोदे व तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत सामाजिक व विधिविषयक केलेले दीपकचे काम दखलपात्र ठरले. दीपक हा यादवराव व हेमलता चटप या शेतकरी दाम्पत्याचा मुलगा आहे.

या कामामुळे जागतिक पातळीवर दखल –

‘लढण्याची वेळ आलीय’ हा काव्यसंग्रह वयाच्या १८ व्या वर्षी तर ‘कृषी कायदे: चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ हे दीपकने लिहीलेले पुस्तक चर्चेत राहीले.

आदिम कोलाम व माडिया समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल.

‘संविधानिक नैतिकता’ हा ‘ऑनलाईन कोर्स’ तयार करून राज्यातील १२०० विद्यार्थ्यांना संविधानविषयक प्रशिक्षण दिले.

करोना काळात सामाजिक संस्थांना सोबत घेऊन जवळपास १३०० कोलाम कुटुंबांना रेशन किट्स वितरण तर चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स देवून नवसंजीवनी दिली.

कृषी न्यायाधिकरण कायद्याचे अशासकीय विधेयक तत्कालीन खासदार राजीव सातव यांनी २०१८ ला लोकसभेत मांडले. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात दीपकची महत्त्वाची भूमिका होती.

‘कोरो इंडिया फेलोशिप’च्या माध्यमातून तळागळात मूलभूत संविधानिक हक्कांवर काम

समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांवर मोफत वकिली, शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग.

येणारा काळ शेतकरीपुत्र व दुर्बल घटकांचा –

“शेतकरी चळवळीने अन्यायाविरूद्ध बंड करायला शिकविले. लखमापूर ते लंडन हा आपला शैक्षणिक प्रवास ग्रामीण भागातील शेतकरी व दुर्बल घटकांतील पुत्रांना ऊर्जा देणारा ठरेल. येणाऱ्या काळात शेतकरी व समाजातील दुर्बल घटकांतील तरुणांना उच्च शिक्षण घेत आपल्या समाजासाठी झटावे लागणार आहे. लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर भारतात परत येऊन शेतकरी, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी रचनात्मक काम करेल. भारतात येणारा काळ हा आमचा असेल.” असं दीपक चटपने म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chandrapur adv deepak chatap gets a scholarship of rs 45 lakh from the british government msr