केंद्रात हंसराज अहिर यांच्याकडे गृह राज्यमंत्रीपद तर राज्यात सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वित्त ही दोन महत्त्वाची खाती असलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ात नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळविली. हाच कल महानगरपालिका निवडणुकीत कायम ठेवण्याचा निर्धार भाजपने केला असून, महापालिकेतही एकहाती सत्ता मिळवायची हे ध्येय समोर ठेवले आहे. मात्र, भाजपला गटबाजी आणि बंडखोरीची भीती आहे. दुसरीकडे काँग्रेसमधील गटबाजीही कमी झालेली नाही.

एकूण ६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत सध्या भाजप, काँग्रेसचा तिवारी-लहामगे गट, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पाऊणेचार लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या या शहराला ऑक्टोबर २०११ मध्ये महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. मनपाच्या पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेस हा २६ सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यापाठोपाठ भाजप १८, शिवसेना ५, राष्ट्रवादी कॉंग्रेस ४, मनसे, बसपा, भारिप प्रत्येकी १ व अपक्ष १० असे एकूण ६६ नगरसेवक आहेत. पहिली अडीच वष्रे महापालिकेत कॉंग्रेस व मित्र पक्षांची सत्ता होती, तर भाजप हा विरोधी पक्ष होता. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या आशीर्वादाने संगीता अमृतकर महापौरपदी विराजमान झाल्या. अमृतकर यांची अडीच वर्षांची कारकीर्द रिलायन्सपासून तर कचरा कंत्राट अशा विविध विषयांनी गाजली. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत नाही तोच सत्तेच्या स्पध्रेत काँग्रेस पक्षात उभी फूट पडली व कॉंग्रेस गटनेते संतोष लहामगे, सभागृत नेते रामू तिवारी व संगीता अमृतकर यांच्यासह १२ नगरसेवकांच्या या गटाने भाजपशी हातमिळवणी केली. कॉंग्रेस नगरसेविका राखी कंचर्लावार यांनी भाजपत प्रवेश घेतला आणि त्या महापौर तर लहामगे स्थायी समिती सभापती झाले. नंतरची अडीच वष्रे भाजपच्या राखी कंचर्लावार महापौर आहेत. त्यांना कॉंग्रेसचा एक गट व मित्र पक्षांची साथ आहे.

भाजप-सेना स्वबळावर

निवडणूक जाहीर होताच महानगरपालिकेत पुन्हा एकदा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे, बसप व भारीप या प्रमुख पक्षांमध्ये सत्ता संघर्षांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप व शिवसेना राज्यात सत्तेत सहभागी असले तरी कुठल्याही स्थितीत भाजपशी युती करणार नाही, असे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी पूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा प्रश्न मिटला आहे. भाजपला सत्ता टिकवून ठेवण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांना बरेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. भाजप नेत्यांना जुन्या चंद्रपूरवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. भाजपमध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखतींवरून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर तथा आमदार नाना शामकुळे या त्रिकुटात संघर्ष झाला. शेवटी यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मध्यस्थी करावी लागली, ही वस्तुस्थिती असली आणि भाजप नेत्यांमध्ये कमालीचे मतभेद असले तरी हे मतभेद सार्वजनिक होत नाहीत किंवा मतदारांसमोर येत नाहीत.

गटातटाचे राजकारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉंग्रेसला गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागणार आहे. यातील पहिला संघर्ष हा कॉंग्रेस नेत्यांना स्वत:शीच करावा लागणार आहे. त्याला कारण या पक्षातील विकोपाला गेलेली गटबाजी. माजी खासदार नरेश पुगलिया, चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर विरुद्ध विधिमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, सभापती संतोष लहामगे व गटनेते रामू तिवारी यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. लहामगे-तिवारी गटाच्या १२ नगरसेवकांना निवडणुकीत उमेदवारी द्यायची नाही अशी पुगलिया गटाची भूमिका आहे, तर १२ नगरसेवक कॉंग्रेस सोडून गेले नसल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळालीच पाहिले अशी वडेट्टीवारांची आग्रही भूमिका आहे. या मुद्दय़ावरून हा संघर्ष चांगलाच पेटला आहे. या संघर्षांत पक्ष निरीक्षक शिवाजीराव मोघे यांच्यासह ९ निरीक्षकांनी कॉंग्रेस उमेदवारांच्या घेतलेल्या मुलाखती अनधिकृत होत्या असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षात नेमके अधिकृत काय आहे इथून सुरुवात आहे. पुगलिया-वडेट्टीवार एकत्र आल्याशिवाय कॉंग्रेसला ही निवडणूक जिंकता येणे शक्य नाही. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि भाजप नेते या दोघांनी एकत्र येऊ नये यासाठीच प्रयत्नरत आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे सर्व नेते एकत्रित लढले तर या पक्षाला सत्तेत येण्यापासून भाजपच काय कुणीही रोखू शकत नाही. पुगलिया व वडेट्टीवार या दोन्ही गटांना भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी हवी आहे. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडीसाठी नेमके कोणाशी बोलावे हा देखील प्रश्न आहे. तिकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची फौज आहे. राष्ट्रवादीचे मनपातील गटनेते संजय वैद्य सोडले तर या पक्षाला उमेदवार मिळावे यासाठीच संघर्ष करावा लागणार आहे. शिवसेनेची मदार पूर्णपणे आमदार बाळू धानोरकर, उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार व माजी उपमहापौर संदीप आवारी यांच्यावर आहे. तुकूम, बंगाली कॅम्प या भागात या पक्षाची चांगली शक्ती आहे. मात्र या पक्षातही उमेदवारी विकली जात असल्याचा आरोप माजी नगरसेवकाने केला आहे. बसपा व भारिप बहुजन महासंघ या पक्षाची शक्ती बाबुपेठ, भिवापूर या पट्टय़ात आहे. विशेष म्हणजे अनिल रामटेके, प्रदीप डे, रमावती अहिर व पारनंदी या चार नगरसेवकांनी बसपामध्ये प्रवेश घेतल्याने बसपाची शक्ती येथे वाढली आहे.