कराड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगातील सर्वोत्तम, आत्मनिर्भर महासत्ता बनवण्याचा संकल्प केला आहे. १५० देशातील लोकांनी मोदींना जगातील सर्वोत्तम नेता मानलेले आहे. तरी अशा अमृतकाळाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा  असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.सातारा लोकसभा प्रवास अंतर्गत  भाजपा कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघ वारियर्स संवाद बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित करताना बावनकुळे कराडमध्ये बोलत होते.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महामंत्री विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, मकरंद देशपांडे, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, आमदार जयकुमार गोरे,नरेंद्र पाटील, माजी खासदार अमर साबळे, ॲड. भरत पाटील, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ,  सुदर्शन पाटसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपाला जगातील सर्वात मोठा पक्ष बनविण्यासाठी अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. इथे बसलेले वारियर्स हे भविष्यातील पक्षाचे नेतृत्व असून, सर्व वारियर्स तसेच कार्यकर्त्यांच्या योगदानातूनच महाविजयाचा हा संकल्प पूर्णत्वास जाणार आहे.येत्या मे-जूनमध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, तेव्हा साताऱ्यातून भाजपाचा खासदार हा महाराष्ट्रात सर्वात जास्त मते घेतलेला असला पाहिजे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावरून किमान निम्यापेक्षा जास्त मते घेऊन भाजपचा सातारचा खासदार विक्रमी मताधिक्याने निवडून आला पाहिजे, हा संकल्प या बैठकीच्या निमित्ताने करूया.

हेही वाचा >>>“…म्हणून सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून येतात”, अजित पवार गटाच्या नेत्याचा टोला

पुढील वर्षी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२४ पूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पूर्ण होईल, तेव्हा सुध्दा सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे लक्ष्य ठेवा असे आवाहन बावनकुळे यांनी केले.विक्रांत पाटील यांनी वारीयर्सना संघटना व मतदान केंद्र बांधणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कराडकरांशी थेट संवाद

‘मेरी मिट्टी मेरा देश’, तसेच घर चलो अभियानांतर्गत’ कराडच्या मुख्य बाजारपेठेतून सायंकाळी उशीरा निघालेल्या भाजपाच्या सवाद्य पदयात्रेत बावनकुळे यांनी जागोजागी व्यापारी, युवक, युवती, महिला, नागरीक यांच्याशी थेट संवाद साधत आपल्या मते सन २०२४ चे पंतप्रधान कोण? असा प्रश्न माईक समोर धरुन विचारला असता, सर्वत्र नरेंद्र मोदींना उत्स्फूर्त पसंती मिळाल्याचे दिसले. काहींनी तर, मोदींचा जयघोषच केला.भाजपच्या या अभियानास नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. भाजपा नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.