काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरही दावा सांगितला आहे.

दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी खासदार सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. एका जुन्या भाषणाचा उल्लेख करत त्यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. अजित पवारांसारखा भाऊ सुप्रिया सुळेंच्या पाठिशी आहे, त्यामुळे त्या मागील अनेक वर्षांपासून लोकसभेत निवडून येत आहेत, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं. अजित पवार गटाच्या एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी हे विधान केलं.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंची साथ असताना अजित पवारांना युतीत का घेतलं? फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

अमोल मिटकरी भाषणात म्हणाले, “खासदार सुप्रिया सुळेंचं एक भाषण ऐकलं. त्या भाषणात सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, फार कमी बहिणी अशा आहेत, ज्यांच्या पाठिशी भाऊ उभा राहतो. मी त्यांच्या मताचं १०० टक्के समर्थन करतो. कारण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी तनाने- मनाने आणि धनाने अजित पवारांसारखा भाऊ सुप्रिया सुळेंच्या पाठिशी आहे. म्हणून सुप्रिया सुळे अनेक वर्षांपासून लोकसभेमध्ये निवडून येतात.”

हेही वाचा- “…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या?

महिला विधेयकावर भाषण करताना सुप्रिया सुळे यांनी संसदेत गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा उल्लेख करत एक सूचक विधान केलं होतं. आपल्या बहिणीचं चांगलं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या घरात नसतो. प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब नसतं, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं.