भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. “शरद पवार शीर्षस्थानी असताना अजित पवारांना असुरक्षित वाटत होतं,” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. तसेच शरद पवारांची ही स्थिती का झाली याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं, असं म्हणत टोला लगावला. ते शनिवारी (७ ऑक्टोबर) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांवर ही वेळ आली आहे. मला त्यांच्याविषयी फार व्यक्त होता येणार नाही. मात्र, शरद पवारांची ही स्थिती का झाली, जयंत पाटलांची ही स्थिती का झाली? त्यांना त्यांचा पक्ष शोधावा लागत आहे. असं का झालं याचा त्यांनी विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरेंनाही त्यांचा पक्ष शोधावा लागत आहे ही स्थिती का झाली?”

“आता शरद पवारांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज”

“अडीच वर्षांपूर्वी हेच सत्तेत होते आणि संपूर्ण महाराष्ट्र आमचा आहे असं म्हणत होते. मात्र, आज त्यांच्यावरही आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे. आम्हीही आमच्या काळात काही आत्मपरिक्षण केलं आहे. आम्ही जेव्हा सत्तेच्या बाहेर गेलो तेव्हा आमच्यावर अशी वेळ का आली याचं आत्मपरिक्षण आम्हीही केलं. आता शरद पवारांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शरद पवारांचं इतकं मोठं राजकीय आयुष्य असूनही त्यांना त्यांचा पक्ष कुठं आहे हे शोधावं लागत आहे,” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

“शरद पवार शीर्षस्थानी असताना अजित पवारांना असुरक्षित वाटत होतं”

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, “तुमच्या हातात जेव्हा पक्ष किंवा सरकार असते तेव्हा सर्वांना डावलून एककल्लीपणे वागून चालत नाही. घरात असो की बाहेर मुख्य लोकांनी आपण करतो ते सर्व बरोबर असं म्हणू नये. मात्र, असं झालं तर मलाही बाहेर जायला फार वेळ लागणार नाही. तेव्हा लोक मला हे योग्य नाही असं म्हणतील. शरद पवार शीर्षस्थानी असताना अजित पवारांना असुरक्षित वाटत होतं. त्यांनी ती असुरक्षितता व्यक्तही केली आहे. त्यांच्यावर ही स्थिती ओढावली आहे आणि ही स्थिती गंभीर होत जाणार आहे.”

हेही वाचा : “सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

“२०२४ निवडणूक येईल तसतसा अजित पवारांना पुन्हा पाठिंबा मिळेल”

“आता अजित पवार सत्तेत आल्यामुळे त्यांच्यावरही लोकांचा विश्वास आहे. या टप्प्यावर २१ व्या शतकात २०२४ मध्ये अजित पवार आमचे निर्णय घेऊ शकतात, अजित पवार आमची कामं करू शकतात, अजित पवार आमच्या मतदारसंघाचा विकास करू शकतात असं लोकांना वाटतं. आता शरद पवार आणि जयंत पाटील विकास कसा करणार आहेत. शेवटी विकासाच्या आणि चढाओढीच्या राजकारणात जो विकास करू शकतो त्याच्यामागे लोक उभे राहतात. जसजशी २०२४ निवडणूक येईल तसतसा अजित पवारांना पुन्हा पाठिंबा मिळेल,” असा दावा बावनकुळेंनी केला.