धनगर समाजाच्या हितासाठी कटिबध्द असलेला भाजप या समाजाला आरक्षण मिळवून दिल्याखेरीज स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कराड दक्षिणमध्ये सत्तास्थानी आता एकच बाबा राहतील आणि ते डॉ. अतुलबाबा भोसले हेच असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपातर्फे आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात ते नांदगाव (ता. कराड) येथे बोलत होते. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

हेही वाचा- ‘काँग्रेस, राष्ट्रवादी मतांचे दान घेऊन पळून जाणारे भ्रष्ट पक्ष’; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने स्वस्वार्थासाठी धनगर समाजाच्या मतांचा वापर करून घेतला. पण, या समाजाच्या हिताचा विचार केवळ भाजपानेच केलाय. केंद्राच्या माध्यमातून धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होईल. या समाजाच्या उन्नतीसाठी भाजप सदैव प्रयत्नशील राहिल. महाराष्ट्रातून डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेची तर गोपीचंद पडळकरांना विधान परिषदेचे सदस्यत्व देऊन देशभरात संख्येने २२ कोटींहून अधिक असलेल्या धनगर समाजाचा भाजपकडून गौरव झाला आहे. कराडमध्ये लवकरच धनगर समाजाचे राष्ट्रीय नेते, केंद्रीयमंत्री एस. पी. बघेल यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम घेतला जाईल. धनगर समाजाला मोठ्या नेतृत्वाची संधी लाभेल असा विश्वास बावनकुळे यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतेपद केवळ भारतालाच नव्हेतर दीडशे राष्ट्रांना भावले आहे. मोदींना जगभरात विश्वगुरु म्हटले जात असल्याने जगाचे नेतृत्व भारताकडे राहणार असल्याचाही दावा बावनकुळे यांनी केला.

हेही वाचा- राज्यभर दोन दिवसीय लाक्षणिक ‘ऊसतोड बंद’ आंदोलन; राजू शेट्टी यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनगर समाज मेळाव्याचे निमंत्रक व भाजपचे प्रदेश पदाधिकारी डॉ. अतुल भोसले यांनी स्थानिक निवडणुकातही कमळ फुलवू, भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष बनवू अशी ग्वाही दिली. भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांचेही भाषण झाले. विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ यांच्यासह धनगर समाज बांधवांची मेळाव्याला मोठी उपस्थिती होती.