राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांनी असं अचानक राजीनामा देण्याची घोषणा केल्याने पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदावरून पक्षात फूट पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.

आमच्या कार्यालयात पक्षप्रवेशासाठी कुणीही आलं तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करू… अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने आमच्याशी तसा संपर्क साधला नाही, असं विधान बावनकुळे यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्थिरता आणि संभाव्य पक्षप्रवेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांनी नेतृत्व बदलाची घोषणा केली आहे. त्यांनी अनेकांचं नेतृत्व घडवलं. त्यांचे लोकांशी भावनात्मक संबंध आहेत. त्यामुळे लोकांना वाईट वाटतं. पण राष्ट्रवादीतील कुणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. आमच्याकडे कुणीही आलं नाही. कुणाच्याही पक्षप्रवेशाची काहीही चर्चा झाली नाही. आणि आमच्यातील कुणीही राष्ट्रवादीतील नेत्यांशी संपर्क साधला नाही.

हेही वाचा- “राष्ट्रवादीचा राज्यातला कारभार अजितदादा…”, छगन भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “सुप्रियाताई…”

“शरद पवारांनी जे काही काम केलं आहे, त्यांच्या कामाचे भावनात्मक संबंध लोकांशी जोडले आहेत. त्यामुळे शरद पवारांनीच पक्ष चालवला पाहिजे, असं त्यांना वाटतं. त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडली आहे. शेवटी आमच्याकडे कुणीही पक्षप्रवेशासाठी आलं तर आमचे दरवाजे उघडेच आहेत. आम्ही कुणालाही नाही म्हणत नाही. आम्ही राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आहोत. आमच्या पक्षात कुणीही यायला तयार असेल तर आम्ही कधीही कुणाचा पक्षप्रवेश थांबवत नाही,” असंही बावनकुळे पुढे म्हणाले.

हेही वाचा- “मुंबईतील बैठकीबद्दल कुणीही कल्पना दिली नाही”, जयंत पाटलांचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्हाला कुणाच्या अस्थिरतेचा फायदा घ्यायचा नाही. आम्हाला त्यांच्याकडे बघायचंही नाहीये. त्ंयाचे निर्णय त्यांनी घ्यायचे आहेत. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कुणी पक्षप्रवेशासाठी आला तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करणारच… त्यांचा पक्षप्रवेश करणारच कारण त्यांना आमची विचारधारा मान्य आहे. ते आमच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. देशाचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून ते भाजपात येत असतील. आमचा विकासाचा अजेंडा मान्य करत असतील. मोदींच्या विकासाच्या संकल्पनेनाला साथ देणारा कुणीही असेल तर आम्ही त्याला पक्षात घेणार आहे,” असंही बावनकुळेंनी नमूद केलं.