महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, महाराष्ट्र भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मध्यरत्री राज ठाकरे यांची भेट घेतली. पाठोपाठ आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची मुंबईतल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये बैठक पार पडली. जागावाटप आणि आगामी लोकसभा निवडणुकीचं नियोजन यासाठीच या बैठका होत असल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने महायुतीत लोकसभेच्या दोन ते तीन जागांची मागणी केली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्याबाबत चालू असलेल्या चर्चेवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आपल्या देशात हिंदुत्व टिकलं पाहिजे, हिंदुत्वाच्या विचारांवर देश आणि आपला महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. तसेच राज्याला आणि देशाला समृद्ध करण्यासाठी विकास झाला पाहिजे. यावर राज ठाकरे यांनी नेहमीच भाष्य केलं आहे. जिथे जिथे मतांच्या तुष्टीकरणाचं राजकारण व्हायचं तिथे राज ठाकरे हे त्यांच्या ओजस्वी वाणीतून प्रखर विचार मांडायचे. त्यांचा पक्ष हा भाजपा आणि शिवसेनेच्या विचारांप्रमाणे चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मला वाटतं की देशाच्या, राष्ट्राच्या कल्याणाकरता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरे यांनी काही विचार केला असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागणुकीमुळे शिवसेना सोडून गेले. खरंतर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेबाहेर ढकललं. परंतु, आता देशाच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरे आमच्याबरोबर येतील. पंतप्रधान मोदींचा विकसित भारत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे हातभार लावतील. राज ठाकरे यांनी तसा विचार केल्यास आम्ही त्यांचं आनंदाने स्वागत करू.

हे ही वाचा >> “…त्या गोष्टीचा बदला घेतला पाहिजे, त्यांना दणका देणार”, बच्चू कडूंचा महायुतीविरोधात शड्डू? लोकसभेला उमेदवार उभे करणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसे महायुतीत आली तर त्यांना किती जागा देणार या प्रश्नावर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी केलेल्या संवादावेळी उत्तर दिलं. प्रसारमाध्यमांवरील दाव्यांनुसार मनसे महायुतीकडे मुंबई, कोकण आणि नाशिकमध्ये लोकसभेच्या जागांची मागणी करत आहे. या चर्चांवरही बावनकुळे यांनी भाष्य केलं. बावनकुळे म्हणाले, महायुतीतले सर्वच घटक पक्ष मिळून आम्ही प्रत्येक मतदारसंघात ५१ टक्के मतं मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तोच आमचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक बुथवर आम्ही काम करत आहोत. प्रत्येक मतासाठी, प्रत्येक जागेसाठी आम्ही लढाई लढू. आमचे उमेदवार निवडून आणू. आम्हाला जिंकण्याचं राजकारण करावं लागेल. महायुतीत ज्यांना जी जागा मिळेल ती लढवून जिंकावी लागेल. आम्ही जागा आणि चिन्हांचा विचार करत नाही. आम्ही केवळ प्रत्येक जागा महायुती कशी जिंकेल यासाठी प्रयत्न करू.