एजाजहुसेन मुजावर

सोलापूर : देश महासत्ता करण्याचे स्वप्न पाहिले जात असताना याच देशात स्वत:चे गाव, घर आणि जमीन नसलेल्या भटक्या विमुक्त जाती-जमातींचे अस्तित्वच नाकारले जात आहे. दुसरीकडे त्यांची उपजीविकेची पारंपरिक साधनेही हिरावून घेतली आहेत. त्यांच्या अशा उपेक्षित आणि वंचित आयुष्याला आधार देण्याचा उपक्रम एका समाजसेवी संस्थेमार्फत सोलापुरात सुरू आहे.

snails in freshwater pune
पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
leopard trapped Surgana Taluka Avalpada,
आदिवासी महिलेच्या धैर्यामुळे मुलांची सुटका अन बिबट्या बंदिस्त
BJP worker Murder, Lonavla rural police,
हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मित्रासह तिघे गजाआड
nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर
Jitendra Awad criticism of BJP regarding the murders print politics news
हत्या करणे भाजपच्या डाव्या हाताचा खेळ; जितेंद्र आव्हाड यांची टीका
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत

भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या चळवळीत गेली पाच दशके काम करणारे बाळकृष्ण रेणके यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात भोगाव शिवारात स्वतःच्या २२ एकर शेतजमिनीचा बराचसा भाग भटक्या सपेरा (साप गारुडी) जमातीतील कुटुंबांना स्थिरावण्यासाठी दिला आहे. सध्या ३२ कुटुंबांचे तेथे पुनर्वसन करण्यात आले आहे.

हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून भटकत आलेले हे या जमातीचे लोक पूर्वी परंपरेनुसार रस्त्यावर सापांचे खेळ दाखवून उदरनिर्वाह चालवायचे. वन्यजीव कायद्याने सापांचे खेळ दाखविण्यास बंदी आली आणि ही भटकी मंडळी पोट भरण्यासाठी फकीर बनून भीक मागू लागले. त्यांच्यातील महिला बहुरूपी होऊन, दुर्गामातेचे सोंग घेऊन भीक मागतात. या जमातीला सन्मानाचे जीवन जगणे माहीतच नाही.

पाच वर्षापूर्वी ही भटकी कुटुंबे रेणके यांच्या संपर्कात आली. त्या वेळी देशात अनेक ठिकाणी मुले पळविणारी टोळी गावात आल्याची अफवा पसरवून अशा भटक्यांवर जमावांनी क्रूर हल्ले केले होते. या जमातीच्या कुटुंबांना समाजविकास व संशोधन संस्था आणि तिच्याशी संलग्न लोकधारा भटके विमुक्त राष्ट्रीय समन्वय संस्थेच्या माध्यमातून रेणके यांनी भोगाव येथे स्वतःच्या शेतात आश्रय दिला.

या भटक्यांमध्ये परंपरेने दारू, गांजाचे व्यसन चालत आलेले. सोबत जुगार, खोटे बोलणे, नशेत महिलांना मारहाण करणे हेही प्रकार या जमातील पुरुष मंडळी करीत होती. रेणके यांनी या मंडळींना आश्रय देताना सर्वप्रथम दारू, गांजाचे व्यसन करायचे नाही, जुगार खेळायचा नाही, महिलांना मारहाण करायची नाही, खोटे बोलायचे नाही, अशा अटी घातल्या होत्या. कोणीही दारू वा गांजाचे व्यसन करताना दिसून आल्यास त्याची शिक्षा म्हणून सर्वांना हाकलून दिले जाईल, असे स्पष्टपणे बजावले होते. सर्वांनी तसे वचन दिले आणि पाली टाकून ही भटकी मंडळी विसावली खरी; परंतु दारू, गांजाचे व्यसन सोडणे सहजासहजी अशक्यच होते. काही दिवसांनी पुन्हा हे भटके व्यसन करताना दिसले. तेव्हा रेणके यांनी एका झटक्यात सर्वांना हाकलून दिले. पुढे काही दिवसांनी हे भटके पुन्हा रेणके यांच्याकडे येऊन गयावया करीत, यापुढे कोणीही व्यसन करणार नाही. त्याचा भंग झाल्यास आम्हाला हाकलून द्या, आम्ही पुन्हा येणार नाही, अशी विनवणी करू लागले. परिणामी, या मंडळींना पुन्हा आसरा मिळाला. आश्चर्य म्हणजे दोन-अडीच वर्षांपासून या भटक्या मंडळींनी व्यसन पूर्ण सोडले आहे. महिलांना मारहाण होत नाही की जुगार खेळणे वा खोटे बोलण्याचे प्रकारही होत नाहीत. त्यांच्यातील हे दोष दूर झाले खरे; परंतु त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रश्न होता. या जमातीचे जीवन स्थिरावत असताना रेणके त्यांना शिधापत्रिका, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, मुलांचे जन्मदाखले मिळवून देण्यासाठी झटत आहेत. बँकेत त्यांची खातीही काढून देण्यात आली आहेत. आजघडीला ६८ मुला-मुलींना जन्मदाखले मिळाले असून त्यांच्या शिक्षणाचा मार्गही खुला झाला आहे.

या भटक्यांच्या मुलांसाठी शाळाच त्यांच्यापर्यंत चालत आली आहे. देशातले हे पहिलेच उदाहरण. त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी ते सातवीपर्यंतची शाळा सुरू आहे. लोकसहभागातून वर्गखोल्यांसह इतर शैक्षणिक सुविधा मिळत आहेत. ही मुले दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन इतर मुलांबरोबर स्पर्धेत उतरतील. त्यांचा सांस्कृतिक विकासही होईल, असा आशावाद रेणके यांनी व्यक्त केला.

या भटक्यांना पालांच्या रूपाने मिळालेला निवारा तात्पुरता आहे. त्यांना पाणी, आरोग्य, वीज, किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण आदी मूलभूत सुविधा मिळण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने खास बाब म्हणून एकात्मिक योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा रेणके यांनी व्यक्त केली. या जमातीत सामाजिक ऋण फेडण्याची भावना निर्माण व्हावी आणि स्वतःच्या पायावर सन्मानाने उभे राहून दुसऱ्यांमध्ये सुधारणा घडवणारे समाज शिक्षक तयार व्हावेत यासाठी रेणके धडपडत आहेत.

भोगावच्या शिवारात रेणके वस्तीवर पाली टाकून राहणारी ही मंडळी पंजाबीमिश्रित हिंदी बोलतात. येथे आमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार मिळत आहे. आमचे आयुष्य गेले, आता आमची मुले-बाळे सन्माने जगतील, अशी आशा ५५ वर्षांच्या बशीर नन्हेमियाँ यांनी व्यक्त केली. मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, मुलांचे जन्मदाखले मिळाले, हा आनंद त्यांच्यासाठी ऑलिम्पिक पुरस्कार मिळाल्यासारखा आहे. आर्थिक उत्पन्नातून उन्नतीचा मार्ग सापडला असताना पुढे आर्थिक बचतीतून व्यवसायासाठी स्वतःचे भांडवल उभे करण्याचा निश्चय या भटक्यांचे चौकीदार निसार रशीद यांनी व्यक्त केला.

करोना टाळेबंदीच्या काळात ही भटकी मंडळी पालावर राहिली. त्यांना आसपासच्या शेतांमध्ये मजुरीची कामे मिळाली. परिसरातील संवेदनशील मंडळींनी त्यांना अन्नधान्य- किराणा आदी मदत पोहोचविली. या पालांवरील एकालाही करोना संसर्ग झाला नाही. त्यांचे लसीकरणही पूर्ण झाले आहे.