– प्रल्हाद बोरसे

मालेगाव : दृष्टिहीन विद्यार्थ्यांना वाचन आणि अध्ययनासाठी ब्रेल लिपी उपयुक्त ठरत असली, तरी १० वीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकांची वानवा असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची गैरसोय होते. या समस्येवर मात करण्यासाठी मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाने उपाय शोधला आहे.

पुस्तकातील मजकुराचे वाचन करणारे आणि हव्या त्या भाषेत श्रवणाची सोय उपलब्ध करून देणारे उच्च तंत्रज्ञानाधारित उपकरण महाविद्यालयाच्या ग्रंथालयात बसविण्यात आले आहे. त्याद्वारे अध्ययनाची उत्तम सुविधा उपलब्ध झाल्याने दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश येणार आहे.

महाविद्यालयीन ग्रंथालयातील पुस्तके हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानप्राप्तीचे एक महत्त्वाचे साधन असते. पुस्तके वाचून ज्ञान मिळवताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अडचण येत नाही. मात्र दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अडथळ्यांची शर्यत करावी लागते. महाविद्यालयीन स्तरावरील अभ्यासक्रमांसाठी निर्माण केलेल्या वाचन साहित्याची ब्रेल लिपीतील अनुपलब्धता हे यामागील कारण असते. तथापि, अहमदाबादमधील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले ‘किबो एक्सएस’ हे उपकरण दृष्टिहीन विद्यार्थ्यांना सतावणारी ही समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, अशी खात्री बळावल्याने महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे ते बसविण्यात आले आहे. सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते या उपकरणाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या विश्वस्त डॉ. संपदा हिरे, प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे, प्राचार्य डॉ. सुभाष निकम आदी उपस्थित होते.

संगणकाला जोडण्यात आलेल्या या उपकरणाद्वारे प्रथम त्यासमोर ठेवलेल्या पुस्तकाच्या पानातील वा हस्तलिखिताचा मजकूर स्कॅन होतो. त्यानंतर ज्या भारतीय भाषेतील आवाजात हा मजकूर ऐकण्याची इच्छा असेल, त्या भाषेसाठीची कळ दाबली की, संगणकाद्वारे हा मजकूर पुस्तक वाचावे तसे मानवी आवाजात ऐकविण्याची क्रिया घडत जाते. त्यायोगे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील हवे ते पुस्तक वाचण्याची म्हणजेच श्रवणाची सोय उपलब्ध झाली आहे. कुठल्याही भाषेतील पुस्तकाचे भारतीय भाषेत भाषांतर करून वाचन करणाऱ्या या उपकरणाद्वारे वाचलेला मजकूर जतनदेखील करता येतो. त्यामुळे इच्छुकांना हवे तेव्हा तो पुन्हा उपलब्ध होत असतो. अशावेळी संबंधित मजकूर पुन्हा स्कॅन करण्याची किंवा पुस्तक हाताळण्याची गरज नाही. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच शहर परिसरातील शाळा-महाविद्यालयांमधील दृष्टिहीन विद्यार्थ्यांनाही ही सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी महाविद्यालयाने दर्शविली आहे.

काय आहे ‘किबो एक्सएस’?

‘किबो एक्सएस’ हे उपकरण अहमदाबादमधील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. हे उपकरण समोर ठेवलेले पुस्तक किंवा हस्तलिखितातील मजकूर स्कॅन करते. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या भाषेसाठीची कळ दाबली की, हा मजकूर पुस्तक वाचावे तसे मानवी आवाजात ऐकविण्याची संगणकाची क्रिया घडते. या उपकरणामुळे दृष्टिहीनांना ग्रंथालयातील हवे त्या पुस्तकाचे श्रवण करता येते.

महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचे ग्रंथालय हे उत्तर महाराष्ट्रातील अग्रणी ग्रंथालय म्हणून प्रसिद्ध आहे. काळानुरूप सुधारणा, ग्रंथसंपदेची सुसज्जता आणि ग्रंथालयातील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सरचिटणीस डॉ. प्रशांत हिरे आणि समन्वयक डॉ. अपूर्व हिरे हे नेहमीच दक्ष असतात. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट उपकरणाच्या माध्यमातून वाचन आणि श्रवण सुविधा उपलब्ध करून देणे, हा त्याचाच भाग आहे, अशी प्रतिक्रिया महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. निलेश नागरे यांनी दिली.