अलिबाग – रायगडच्या समुद्रकिनारीदेखील चरस या अंमली पदार्थाचा साठा सापडण्याचे सत्र सुरूच आहे. दिवसभरात अलिबाग, दिघीसागरी आणि श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची पाकीटे आढळून आली आहेत. आत्ता पाच दिवसांत सात कोटी रुपयांची १७६ किलो चरसची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून सर्व समुद्र किनाऱ्यांवर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

सुरवातीला श्रीवर्धन येथील जिवना बंदर येथे चरसच्या ९ बॅग आढळून आल्या. नंतर हरिहरेश्वर येथील मारळ समुद्र किनाऱ्यावर तीस पाकिटे आढळून आलीत. यानंतर सर्वे समुद्र किनाऱ्यावर २४ पाकिटे सापडलीत. तद्नंतर कोंडीवली आणि आदगाव समुद्र किनारी १३ पाकिटे आढळून आलीत. दिवेआगर समुद्र किनाऱ्यांवर ३३ बॅग आढळून आल्या. कोर्लई आणि थेरोंडा समुद्र किनाऱ्यावर १९ पाकिटे आढळलीत. तर आज दिवसभरात आक्षी समुद्र किनाऱ्यावर ६ नानिवली येथे १ तर श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर १२ पाकिटे आढळली आहेत. त्यामुळे गेल्या पाच दिवसांत सात कोटी रुपयांची १७६ किलोग्रॅम वजनाची चरसची १४७ पाकिटे आढळून आली आहेत.

हेही वाचा – ताडोबात जंगल सफारीसाठी नवीन संकेतस्थळाची चाचपणी सुरू

हेही वाचा – सणासुदीच्या काळात आपत्कालीन भारनियमनाचे संकट, वीज उत्पादन व मागणीचा ताळमेळ साधण्यासाठी महावितरणची कसरत

श्रीवर्धन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सागरी पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहा. किनारपट्टीवरील भागात गस्त वाढवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत. स्थानिकांच्या मदतीने सकाळ संध्याकाळ गस्त घालून समुद्र किनाऱ्यांवरील संशायास्पद पाकिटांचा शोध घेण्याचे निर्देश या निमित्ताने देण्यात आले आहेत.