वेगवेगळ्या कायद्यांच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायाविरोधात औषध व्यावसायिकांनी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक जिल्ह्यातील सर्वच विक्रेते सहभागी झाल्यामुळे रुग्णांना नाहक फटका सहन करावा लागला. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील २५ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे औषध व्यावसायिकांच्या संघटनेने म्हटले आहे. या देशव्यापी संपात नाशिक जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्वच सदस्य सहभागी झाल्याचा दावा अध्यक्ष नितीन देवरगांवकर यांनी केला. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून संघटनेने काळजी घेतल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. ‘एलबीटी’विरोधात व्यापारी संघटनांनी बंदचे हत्यार उपसले असतानाच त्यात वेगळ्या कारणामुळे औषध विक्रेत्यांची भर पडली. वेगवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून औषध विक्रेत्यांना वेठीस धरले जात आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले. जिल्हा संघटनेच्या वतीने अध्यक्ष देवरगांवकर, उपाध्यक्ष रत्नाकर वाणी, सचिव योगेश बागरेचा आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारचे जाचक धोरण व परकीय गुंतवणुकीच्या मुद्दय़ांचा समावेश असलेले निवेदन मोर्चेकऱ्यांनी संबंधित विभागाला दिले. बंदच्या काळात रुग्णांना अतिआवश्यक औषधे मिळावीत म्हणून संघटनेने केमिस्ट भवन येथे व्यवस्था केली असली तरी त्याबाबत फारशी माहिती नसल्याने रुग्णांचे हाल झाले. सर्वच औषध दुकाने बंद असल्याने त्यांना आवश्यक ती औषधे मिळणेही दुरापास्त झाले.
संग्रहित लेख, दिनांक 11th May 2013 रोजी प्रकाशित
औषध विक्रेत्यांच्या आंदोलनाचा रुग्णांना फटका
वेगवेगळ्या कायद्यांच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायाविरोधात औषध व्यावसायिकांनी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक जिल्ह्यातील सर्वच विक्रेते सहभागी झाल्यामुळे रुग्णांना नाहक फटका सहन करावा लागला. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील २५ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे औषध व्यावसायिकांच्या संघटनेने म्हटले आहे.
First published on: 11-05-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemists strike hits patients hard