अकोले : जिल्ह्याची चेरापुंजी अशी ओळख असणाऱ्या घाटघर येथे एक जूनपासून आजपर्यंत १ हजार ८८१ मिमी पाऊस पडला आहे. मात्र तूर्त तरी चेरापुंजीचा मान रतनवाडीला मिळाला आहे. कारण घाटघरपेक्षाही अधिक म्हणजे १ हजार ९१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दोन्ही ठिकाणांसह पाणलोट क्षेत्रात सर्वच ठिकाणी जून महिन्यात या वर्षी विक्रमी पाऊस पडला. जूनच्या मध्याला सुरू झालेला पाऊस अद्याप सुरूच आहे. मागील वीस दिवस अखंडपणे तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे आदिवासी पट्ट्यात जनजीवन विस्कळीत झाले असून सर्व परिसर गारठून गेला आहे.

मुसळधार पावसामुळे आजही धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक झाली. निळवंडे धरण ७० टक्के तर मुळा धरण ६० टक्के भरले आहे.भंडारदरा धरणात आज विक्रमी ७०१ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. चोवीस तासातील आजपर्यंतची. ही सर्वाधिक आवक होय. पाणी पातळी नियंत्रणासाठी धरणातून आजही ६ हजार ८६३ क्युसेक विसर्ग सुरू होता. ५१० दिलघफूट पाणी आज धरणातून सोडण्यात आले.

निळवंडे धरणातही आजपर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे ७७५ दिलघफूट पाण्याची आवक झाली. निळवंडे धरणातून ६०० क्युसेकने आवर्तन सुरू आहे. त्यामुळे चोवीस तासांत ५२ दलघफूट पाणी सोडले गेले तर ७२३ दलघफूट पाणी साठविले गेले. आज सकाळी निळवंडे धरणाचा पाणीसाठा ५ हजार ८११ दलघफूट (६९.७८ टक्के) झाला होता.

मुळा नदीच्या पाणीपातळीत आज मोठी वाढ झाली. सकाळी कोतुळजवळ मुळा नदीचा विसर्ग १० हजार ३४२ क्युसेक होता. मुळा धरणाचा पाणीसाठा सकाळी १५ हजार ५९५ दलघफूट (५९.९८ टक्के) होता.तालुक्याच्या पूर्व भागात आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती तर पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. वीस दिवसांपासून सुरू असणारी पावसाची संततधार, भरभरून वाहणारे ओढे-नाले, तुडुंब भरलेली भातखाचरे या सर्वांमुळे जलमय झालेला परिसर यामुळे आदिवासी पट्ट्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर गारव्यामुळे सर्व परिसर गारठून गेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजचा आणि आजपर्यंतचा एकूण पाऊस मिमीमध्ये : भंडारदरा ७२ (११४०), घाटघर ९२ (१८८१), पांजरे ७३ (१२४५), रतनवाडी ९८ (१९१५), वाकी ५८ (८५९), निळवंडे २८ (४८८), आढळा धरण ५ (११७), अकोले १८ (३४९), कोतुळ – (२२५).