मालवणमधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सदोष वधाचा गुन्हा दाखल झालेल्या कोल्हापूर येथील बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला काल पोलिसांनी अटक केली. आज मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने डॉ. चेतन पाटील याला दि. ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्यानंतर मालवण पोलीस स्थानकात या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील या दोघांवर सदोष वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हे दोघेही बेपत्ता होते. काल कोल्हापूर पोलिसांनी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला ताब्यात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व मालवण पोलीस यांच्या ताब्यात दिले. त्यावेळी मालवण पोलिसांनी पाटील याला अटक केली. यानंतर आज पाटील याला मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी डॉ. चेतन पाटील याला दि. ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मालवण पोलिसांनी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती गोळा करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला, “काही लोकांना रोज माझा राजीनामा मागितल्याशिवाय..”

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “मुख्यमंत्र्यांचा ‘लाडका मंत्री’ असतो तेव्हा काय होऊ शकतं? बघा…”, वडेट्टीवारांची मुख्यमंत्री शिंदेंसह मंत्री राठोडांवर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मालवण राजकोट किल्ल्यावर भेट दिली. दरम्यान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उद्या रविवार दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता त्याठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर कुडाळ येथे सभेला संबोधित करणार आहेत, असे मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष सुहास सावंत यांनी सांगितले. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले मालवण राजकोट किल्ल्यावर उद्या दि. १ सप्टेंबर रोजी भेट देऊन पाहणी करणार आहेत.