राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीन पखाले

यवतमाळ : नेतृत्व विकासासाठी जागतिक स्तरावर दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित अशा ‘चेवनिंग’ शिष्यवृत्तीसाठी येथील राजू केंद्रे या सामाजिक कार्यकर्ता विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शिष्यवृत्ती निवड मंडळाने राजूला शेवटचा प्रश्न विचारला, ‘तुझी या स्कॉलरशिप साठी निवड झाली नाही तर काय करशील? माझी निवड नाही झाली तरी पुढच्या १० वर्षांत १० एकलव्य चेवनिंग स्कालर्स असतील’, असे उत्तर त्याने दिले आणि जगभरातील १६० देशातील एक हजार ३५० विद्यार्थ्यांमधून राजूची निवड झाली.

फॉरेन कॉमनवेल्थ विभागाच्या वतीने दिली जाणारी चेवनिंग शिष्यवृत्ती ब्रिटिश सरकारच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमातील महत्त्वाची आणि मानाची समजली जाते. जवळपास ४५ लाख रुपयांची ही शिष्यवृत्ती असून इंग्लंडमध्ये शिकायला लागणारा सर्व खर्च पुरवते. या शिष्यवृत्तीसाठी १६० देशांमधील ६३ हजार अर्ज आले होते. त्यातील पाच हजार विद्यार्थ्यांनी दोन फेऱ्यानंतर मुख्य मुलाखत दिली. त्यातून  एक हजार ३५० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीकरिता अंतिम निवड झाली. मंगळवारी राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे याला ही शिष्यवृत्ती जाहीर झाली. बुलढाणा जिल्ह्यतील लोणार तालुक्यातील पिंप्री (खंदारे) हे राजू याचे गाव आहे. तेथे त्याचे आई-वडील शेती करतात. राजू केंद्रे याने यवतमाळच्या सावित्री ज्योतिबा समाजकार्य महाविद्यालात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करत असताना ‘एकलव्य अ‍ॅकेडमी’ नावाने शैक्षणिक चळवळ सुरू केली. मुख्यमंत्री फेलाशिपमध्येही त्याने यवतमाळ जिल्ह्यत अनेक पारधी बेडय़ांवर काम केले. सध्या तो यवतमाळातून एकलव्य चळवळीद्वारे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करतो. या विद्यार्थ्यांसाठी अडगळीतील पुस्तके संकलन करून ती गरजूंना देण्याचा त्याचा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहे.

ब्रिटनमध्ये शिकून परत मायदेशी येऊन काम करू पाहणाऱ्या नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती मिळवणारा राजू हा कदाचित पहिला असा विद्यार्थी असावा जो पदवीपर्यंत मराठी माध्यमात आणि पदवीनंतर मुक्त विद्यापीठातून शिकलेला आणि भटक्या प्रवर्गातून आलेला आहे. त्याने एक वर्षांपूर्वी या शिष्यवृत्तीकरिता तयारी सुरू केली होती. आजपर्यंत त्याला जागतिक स्तरावरील १८ विद्यापीठांच्या विविध मास्टर्स अभ्यासक्रमासाठी ऑफर आल्या आहेत. यातली बहुतेक विद्यापीठे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार पहिल्या २०० मधील आहेत आणि नऊ विद्यापीठे पहिल्या १०० मधील आहेत. या विद्यापीठांत मास्टर्सचे शिक्षण पूर्ण करायला वर्षांला जवळपास ४० लाख रुपये लागतात. या शिष्यवृत्तीमुळे राजू केंद्र याला यापैकी कोणत्याही विद्यापीठात शिक्षण घेता येणार आहे.

परदेशातून शिक्षण घेऊन परतल्यानंतर आपल्यासारख्या अभावाचे जगणे जगणाऱ्या आणि शैक्षणिक संधी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा शिष्यवृत्तींच्या माध्यमातून परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचा निश्चय केला असल्याचे राजू केंद्र याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. राजूचा लोणार ते लंडन व्हाया यवतमाळ हा प्रवास संघर्षांतून पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया त्याचे यवतमाळ येथील मार्गदर्शक प्रा. घनश्याम दरणे यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chevening scholarship farmers son ssh
First published on: 01-07-2021 at 00:15 IST