Chhagan Bhujbal on Ajit Pawar & NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांना राज्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद देण्यात आलं आहे. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची या पदावरून उचलबांगडी केल्यानंतर काही दिवस हे पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याकडे ठेवलं होतं जे आता भुजबळांकडे सोपवण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) व इतर लहान पक्षांच्या महायुतीने विजय मिळवला होता. त्यानंतर महायुतीने राज्यात सरकार स्थापन केलं. पाठोपाठ या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र, नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे छगन भुजबळ पक्षावर, पक्षप्रमुख अजित पवार यांच्यावर नाराज होते.

“…वहां नहीं रहना”, भुजबळांचा पक्षाला इशारा

भुजबळांनी त्यांची नाराजी जाहीर कार्यक्रमांमधून बोलून दाखवली होती. ‘जहां नहीं चैना, वहां नहीं रहना’ असं म्हणत भुजबळांनी पक्षाला व पक्षप्रमुख अजित पवारांना सूचक इशाराही दिला होता. छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे अजित पवारांशी अबोला धरला असल्याच्या चर्चा देखील रंगत होत्या.

भुजबळांचा अजित पवारांशी अबोला

आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाला आहे. दरम्यान, आपण अजित पवारांशी अबोला धरला होता ही गोष्ट भुजबळ यांनी मान्य केली आहे. तसेच पक्ष सोडण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला होता असंही त्यांनी सांगितलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

“मी अजित पवारांशी बोलत नव्हतो पण…”

भुजबळ यांना विचारण्यात आला की मंत्रिपद न मिळाल्यामुळे एक वेळ अशी आली होती की तुम्ही अजित पवार यांच्याशी बोलत नव्हता ते खरं आहे का? यावर भुजबळ म्हणाले, “हो! ते खरं आहे. परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) सगळ्या कार्यक्रमांना हजर होतो. मी १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजर होतो. मंचावर अजित पवार यांच्या शेजारी बसलो होतो. अलीकडेच शिर्डीला आमच्या पक्षाचं अधिवेशन पार पडलं, त्या अधिवेशनाला देखील मी गेलो होतो. ठीक आहे, मी त्यांच्या घरच्या कार्यक्रमांना गेलो नव्हतो. परंतु, पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत होतो”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्ष सोडण्याचा विचार

भुजबळ म्हणाले, “मी अजित पवार यांच्या कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित नसलो तरी पक्ष सोडला नव्हता”. यावर भुजबळ यांना विचारण्यात आलं की पक्ष सोडण्याचा विचार तुमच्या मनात आला होता का? त्यावर भुजबळ म्हणाले, “हो! असा विचार आला होता. कारण हे सगळं कशासाठी चाललंय ते कळत नव्हतं”.