मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी या गावात सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी १० दिवसांत आरक्षण द्या अन्यथा पुढच्या गोष्टी सरकारच्या हातात नसतील असं म्हटलं आहे. तसंच छगन भुजबळ यांचं नाव न घेता आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन त्यांनी टीका केली आहे. यासंदर्भात आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
“माझ्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक मराठा नेत्यांसह काम केलं. माझेही काहीतरी योगदान आहे. मला मात्र आज मराठ्यांनी मोठं केलं असं सांगत शिव्या दिल्या जातात. मात्र मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं. मराठा समाज नादान किंवा असंस्कृत नाही, माझ्यामुळे त्यांच्या फूट पडणार नाही.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “…तर माझी अंतयात्रा निघणार”; मनोज जरांगेंची टोकाची भूमिका, म्हणाले…
जीव जाणार असेल तरीही..
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना मला जीवे मारण्याची धमकी आली असल्याचंही म्हटलं आहे. नाशिकमध्ये त्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. “मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. तू जिवंत राहणार नाहीस, तुझी वाट लावू अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत आहेत. मात्र अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही. मी यासंदर्भातली तक्रार पोलिसांकडे की आहे. आता पोलीस पुढचं पुढे काय ते बघतील.” असं भुजबळ म्हणाले आहेत.
हे पण वाचा- “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी अन्यथा..”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाजकार्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठं केलं, असं सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठं हे शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यासोबत मी काम केलं आहे. माझं देखील काहीतरी योगदान आहे. म्हणूनच मला संधी दिली गेली असेल. माझा माझ्या समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत.
