उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी ( २७ ऑगस्ट ) बीड जिल्ह्यात सभा पार पडली. या सभेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. २३ डिसेंबर २००३ साली तुम्ही माझ्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला. माझी काय चूक होती? असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना विचारला आहे.

“शरद पवार म्हणतात, ‘माझ्यापासून काही शिकला की नाही?’ होय आम्ही शिकलो. पण, धनंजय मुंडे यांचा इतिहास तुम्ही काढला. साहेब तुम्ही कुठून कुठे आलात. ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती,” असा हल्लाबोल भुजबळांनी पवारांवर केला आहे.

“पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष मी झालो. तुम्ही आणि मी महाराष्ट्रात दोघेच फिरत होतो. थोडे आमदार कमी पडले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री, तर मी उपमुख्यमंत्री झालो. पण, मला एक कळलं नाही. २३ डिसेंबर २००३ साली माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामा तुम्ही घेतला. माझी काय चूक होती?” असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवारांना विचारला.

हेही वाचा : “धनंजय मुंडे यांच्या वाट्याला आयुष्यभर संघर्ष, पण…”, अजित पवार यांचं विधान

“तेलगीला अटक करत त्याच्यावर मोक्का लावण्याचे आदेश मी दिले. तेव्हा तुम्ही मला बोलावलं आणि राजीनामा देण्यास सांगितलं. झी टीव्हीच्या तिकडे दगडफेक झाली आहे. राजीनामा द्या, असं तुम्ही म्हटलं. नंतर फोन आला भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही. तरीही तुम्ही माझा राजीनामा घेतला,” अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “शरद पवार यांनी बीड जिल्ह्याला काय दिलं?” धनंजय मुंडे यांचा थेट हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“१९९२-९३ आणि ९४ साली खैरनार यांनी तुमच्यावरही आरोप केले होते. तुमचा राजीनामा कोणी मागितला नाही. मग माझा राजीनामा का घेतला?” असा संतप्त प्रश्न भुजबळांनी पवारांना विचारला आहे.