Chhagan Bhujbal : एकत्रित राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाचे स्वंतत्र, पहिलेच दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे आजपासून सुरू झाले. अधिवेशनापुढे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षबांधणी असे विषय असणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमात नाराज असलेले छगन भुजबळ आणि वादग्रस्त ठरलेले धनंजय मुंडे येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावरून छगन भुजबळांनी या अधिवेशनाला हजेरी लावली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीनुसार मी अधिवेशनाला आलो असल्याचं ते म्हणाले.

महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने पक्षाचे वजनदार नेते, आमदार छगन भुजबळ नाराज आहे. भुजबळ यापूर्वीच्या पक्षाच्या कार्यक्रमांना तसंच, पंतप्रधानांच्या मुंबईतील बैठकीसही अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीकडे पक्षातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष होते. दरम्यान, आज त्यांनी शिर्डीतील अधिवेशनात हजेरी लावली. याबाबत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिली आहे.

हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतल्यानंतर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “सरकारी तिजोरी…”

नाराजी दूर झाली का?

छगन भुजबळ अधिवेशनात हजर राहिल्याने पत्रकारांनी त्यांना नाराजी दूर झाली का असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, नाराजी दूर होण्याचा प्रश्न येत नाही. प्रफुल्ल पटेल काल (१७ जानेवारी) दोन तास येऊन बसले होते. त्यांनी थोड्यावेळाकरता अधिवशेनात येण्याची विनंती केली. सुनील तटकरेंनीही फोन केला होता की येऊन जा. यानिमित्ताने साईबाबांचंही दर्शन होईल.

दरम्यान, छगन भुजबळ यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. याबाबत ते म्हणाले, “माझी प्रकृती बरी नसल्यानेच मी कोट वगैरे घालून आलोय. त्यामुळे मला येथे पूर्णवेळ थांबता येणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांनी संपर्क साधला नाही

“हे पक्षाचं शिबिर आहे. कोणाही व्यक्तीचं शिबिर नाही. मी येथे आलोय, म्हणजे सर्व गोष्टी स्वच्छ झाल्या असं होत नाही. राज्यसभेवर जाण्याचा प्रस्ताव माझ्याकडे नाही. मंत्रि‍पदाची वाटणी करताना तो प्रस्ताव माझ्याकडे होता, तेव्हाच मी तो नाकारला होता. अजित पवारांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही”, असंही छगन भुजबळांनी स्पष्ट केलं.