Chhagan Bhujbal : अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला तेव्हा त्यात अनेक वरिष्ठांची नावं नव्हती त्यापैकी एक नाव होतं ते छगन भुजबळ यांचं. अजित पवारांनी छगन भुजबळ यांचा पत्ता कापला अशीही चर्चा तेव्हा झाली होती. एवढंच नाही तर जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना हा छगन भुजबळांचा डायलॉगही गाजला होता. आता याच भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री होते आहे.
राजभवनात होणार छगन भुजबळ यांचा शपथविधी
छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा राजभवनात होणार असून या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. आता छगन भुजबळ यांना कुठलं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धनंजय मुंडे जे खातं होतं तेच छगन भुजबळांना दिलं जाईल अशी चर्चा आहे.
धनंजय मुंडेंचं खातं छगन भुजबळांना मिळणार?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. छगन भुजबळ यांना हेच दिलं जाईल अशी चर्चा रंगली आहे. आता नेमकं छगन भुजबळांना कुठलं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
अखेर भुजबळांची नाराजी दूर
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असूनही महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी अजित पवारांवरही टीका केल्याचं दिसून आलं. भुजबळांची हीच नाराजी आता दूर करण्यात येणार आहे. अजित पवारांनी मंत्रिपदावरून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीसांनी भुजबळांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता.
ओबीसी मतदार बरोबर राहण्यासाठी अजित पवारांची खेळी?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुतीकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही खेळी खेळल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. धनंजय मुंडे यांच्या रुपाने ओबीसी नेतृत्व या आधी मंत्रिमंडळात होतं. पण त्यांना संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. आता छगन भुजबळांच्या रुपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात असणार आहे. छगन भुजबळांनी त्यांच्या नाशिकमधील काही निवडक कार्यकर्त्यांना सोमवारी रात्रीच मुंबईत बोलावून घेतलं आहे.