Chhagan Bhujbal On Eknath Shinde Swearing in as Deputy Chief Minister : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. यानंतर आज (५ डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला देशातील अनेक प्रमुख नेते उपस्थित असणार आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे मानलं जात होतं. मात्र याबद्दल महायुतीकडून अधिकृतरीत्या कुठलीही माहिती जाहीर केली जात नव्हती. अखेर दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्याबरोबर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हेही नक्की झालं. पण एकनाथ शिंदे यांच्याबाबत संदिग्धता कायम होती. गेल्या दोन दिवसांपासून चाललेल्या अनेक भेटीगाठी, बैठका आणि राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीला मिळालेल्या बहुमताबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “आनंदाचं वातावरण आहे. कारण १९८५ साली मी पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हापासून मी विधिमंडळात आहे. तेव्हापासून इतकं मोठं बहुमत सरकारी पक्षाला मिळाल्याचं मी पहिल्यांदाच पाहतो आहे. अशा बहुमतासाठी लोकांची मने जिंकावी लागतात”.
दरम्यान आज (५ डिसेंबर) आझाद मैदानावर फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे तीनच जण शपथ घेत असल्याबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले की, “हे तीन प्रमुख आहेत. ये तीन जण एकत्र आले की तिन्ही पक्ष एकत्र आल्याचा संदेश जाईल. प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचादेखील शपथविधी होईल”, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला!
तर मीही नाराज झालो असतो..
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल बोलताना एखाद्याचं मंत्रीपद गेल्यावर कोणीही नाराज झालं असतं असे भुजबळ म्हणाले आहेत. “एखाद्याचं मंत्रीपद गेलं की तो नाराज होतो, हे स्वाभाविक आहे. जर एखाद्याचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि उपमुख्यमंत्रीपदावर काम करायला सांगितलं तर कोण नाराज होणार नाही? हा मानवी स्वभाव आहे, मी देखील नाराज झालो असतो”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष मुख्यमंत्री होते. १०५ आमदार असताना एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन आले. यावेळी सगळ्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं. पण वेगळंच झालं. शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी फडणवीसांनी सांगितलं की, मी बाहेर राहून सरकारला पूर्णपणे पाठिंबा देणार, परत वरून आदेश आला की तुम्ही सरकारमध्ये सामिल व्हा आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करा. त्यांना थोडं दुःख तरी झालचं असेल. त्यांनी त्या आदेशाचं पालन केलं. त्यांनी उपमुख्यमंत्रपद घेतलं जीव तोड मेहनत केली. त्यांच्या पदाला न्याय दिला आणि त्यांच्या पक्षाचे १३२-१३३ आमदार निवडून आले. नाराज तर तेपण झाले. त्यांचं नाराज होणं चूक म्हणत नाही. पण वास्तविकता काय आहे हे आपल्याला पाहवच लागतं”, असेही छगन भुजबळ म्हणाले.