Chhagan Bhujbal Oppeses Ajit Pawar Remark on Reservation should be given on financial status : “ज्याला त्याला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं”, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली होती. मात्र, अजित पवारांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षातून विरोध होऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) वरिष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “अजित पवारांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे.” आर्थिक व शैक्षणिकपेक्षा सामाजिक मागास असणं हा आरक्षणाचा प्रमुख निकष असल्याचं त्यांनी नमूद केलं. “जे सामाजिकरित्या मागास आहेत त्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे”, अशी रोखठोक भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे. तसेच अजित पवारांच्या भूमिकेचा आम्ही विरोध करू असंही त्यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “ठीक आहे, अजित पवारांना करायचं आहे ते करू द्या. परंतु, आमचा त्यांच्या भूमिकेला कट्टर विरोध आहे. आमची भूमिका ही कट्टर विरोधाची आहे. कारण आरक्षणाचं मूळ सामाजिक मागसलेपणात आहे. आर्थिक किंवा शैक्षणिक हे देखील निकष असले तरी सामाजिक मागास असणं आवश्यक आहे. सामाजिकरित्या मागास असणं हा पहिल्या क्रमांकाचा निकष आहे. त्यामुळे जे समाजिकरित्या मागास असतील त्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे.”
अजित पवार काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना अठरापगड जातीच्या लोकांना, बारा बलुतेदारांना आपल्याबरोबर घेतलं. त्याच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार घेऊन आपण पुढे गेलो तरच आपलं भलं होईल ही गोष्ट कृपा करून लक्षात घ्या. त्यामुळे कोणी जातीपातीच्या राजकारणात पडू नका. कोणी काही चुकीचं खूळ डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला सांगा आपण सगळी हाडामासाची माणसं आहोत, सगळ्यांचं रक्त लाल आहे, जातीच्या भानगडीत पडू नको.
“जातीबद्दल बोलायचं झाल्यास प्रत्येकाला आदर मिळायला हवा. ज्याच्या त्याच्या मागणीप्रमाणे, त्यांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण मिळायला हवं. परंतु, यात कोणी राजकारण करत असेल तर त्याला आवर घालायला पाहिजे.”
अजित पवार म्हणाले, “मित्रांनो जातीपातीचा, नात्यागोत्याचा विचार करू नका, मी राजकारण करत असताना कधीच कोणाची जात-पात, नातंगोतं बघितलं नाही, बघत नाही. मी केवळ माणूस बघतो आणि त्याची मदत करतो.”