कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील गावांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. तसेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. दरम्यान, यामुद्यावरून बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांबाबत केलेल्या विधानावरून चांगलाच समाचार घेतला. तसेच बाळासाहेब हे संयुक्त महाराष्ट्रासाठी शेवटपर्यंत लढले, असेही ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले छगन भुजबळ?

“आज कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांबाबत जे काही सांगतात, पण त्यापूर्वी बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर हे महाराष्ट्राचा भाग आहेत, आधी ते महाराष्ट्राला द्या, मग बाकीच्या गोष्टी करा”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. “बेळगावमधून वारंवार महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार निवडून आले आहेत. कित्येक वेळा या मुद्द्यावरून बेळगावमध्ये महापौर निवडून आले. त्यांची महाराष्ट्रात येण्याची जिद्द आजही जिवंत आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – विश्लेषण: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार तरी कधी? हा वाद काय आहे?

”बाळासाहेब शेवटपर्यंत लढले”

यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेबांनी सीमाप्रश्नी केलेल्या आंदोलनाच्या आठवणींनाही उजाळा दिला. “बाबासाहेब ठाकूरांनी बाळासाहेबांकडून सीमाप्रश्नावर लढण्याचे वचन घेतलं होते. बाळासाहेबांनी या मुद्यावर शेवटपर्यंत लढण्याचे वचन दिले आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी शेवटपर्यंत लढा दिला. यामुद्द्यावर आम्हाला मोरारजी देसाईंना निवेदन द्यायचे होते. मात्र, त्यांनी ताफा न थांबवता एका शिवसैनिकाला उडवलं. त्यावेळी अनेक शिवसैनिकांनी बलिदान दिलं. त्यातून जी मुंबई पेटली. बाळासाहेब ठाकरे, दत्ताजी सावळी आणि इतरांना अटक झाली. शेवटी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बाळासाहेबांना विनंती केली आणि बाळासाहेबांच्या आदेशानंतर मुंबई शांत झाली. शिवसैनिकांनी मुंबईचा रस्तेही साफ केले होते”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “तिथे बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा कट”, संजय राऊतांचा गंभीर दावा; म्हणाले, “मला माहितीये, पण…!”

दरम्यान, यावेळी त्यांनी धारवाडमध्ये केलेल्या आंदोलनाबाबतही सांगितले. “आम्ही सीमा प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी धारवाडमध्ये होतो. त्यावेळी आमच्यावर हल्ला करण्यात आला. अनेक शिवसैनिक रक्तबंबाळ झाले होते. आमच्या पोटात अन्न, पाणी काहीही नव्हतं. आम्हाला बसमध्ये बसवण्यात आलं. रात्री १२ वाजता आम्हाला एका ठिकाणी सोडण्यात आलं. पाऊस सुरू होता. कोणी तरी न्यायाधीश तिथं होते. त्यांच्या भाषेत ते काही तरी बोलत होते. त्यानंतर आम्हाला म्हणाले आम्ही तुम्हाला सोडतो. माझ्या मते, भारत हा एक देश असेल, तर भारतातले कायदे येथील लोकशाही ही सर्वांना लागू आहे. मग आम्ही शांतेतने आंदोलन करताना आमच्यावर हल्ला करण्याची गरज नव्हती. त्यावेळी एका पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप करत माझ्यावर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल झाला होता. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर ती केस मागे घेण्यात आली. इतक्या कठोपणे ते वागले होते”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal remember balasaheb thackeray memmories on maharashtra karnatk border issue spb
First published on: 29-11-2022 at 13:03 IST