नाशिकमधील नांदगाव विधानसभेत छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाणं आहे. दरम्यान, या आरोपांबाबत आता छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं असून हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे ते म्हणाले. तसेच आमच्या निष्ठेबाबत सुहाम कांदेंनी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, अशी टीकाही त्यांनी केली. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी भुजबळ यांनी संदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – छगन भुजबळ नाशिकच्या प्रचारात सहभागी का नाहीत? अजित पवार म्हणाले…

काय म्हणाले छगन भुजबळ?

सुहान कांदे जे बोलले ते चुकीचं आहे. आम्ही हेमंत गोडसे आणि भारती पवार यांचा प्रचार करत आहोत. फक्त कमळ ही निशाणी आहे. हे समजून कामाला लागा, असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. त्यामुळे आमच्या निष्ठेबाबत सुहाम कांदेंनी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी दिलं.

सुहास कांदे आमचे विरोधक राहिले आहेत. ते नेहमी खोटं बोलतात. नाशिकमधील लोक कांद्याच्या प्रश्नांवरून आधीच नाराज आहेत. त्यात कांदेंच्या विधानांमुळे लोकांमध्ये आणखी नाराजी पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन कांद्यांचा त्रास भारती भारती पवार यांना व्हायला नको. सुहास कांदेंनी त्यांचे काम करावं, आम्हाला आमचं काम करू द्यावं, असेही ते म्हणाले.

आमचे कार्यकर्ते भारती पवार प्रचार करत आहेत. त्यासंदर्भात अनेक बैठका आम्ही घेतल्या आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे त्यांचे काम करत आहेत. मात्र, सुहास कांदेबरोबर काम करणे आम्हाला शक्य नाही. अशी प्रकारे विधानं करून ते भारती पवार यांच्याविरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंसाठी महायुतीचे दरवाजे खुले? पंतप्रधानांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, “राजकारणात आजचा शत्रू…”

सुहास कांदे नेमकं काय म्हणाले होते?

आज सकाळी माध्यमांशी बोलताना सुहान कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीचे नेते तुतारीचा प्रचार करत असून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत. छगन भुजबळ यांना महायुतीमधून मंत्रीपद मिळाले आहे आणि काम करायच्या वेळी ते तुतारीचा प्रचार करत आहेत. तुम्हाला तुतारीचा एवढा पुळका असेल तर तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुतारीचे काम करा. भाजपाचेही नेते जर शांतपणे हे पाहत असतील तर हे दुर्दैव आहे”, असे ते म्हणाले होते.