Chhagan Bhujbal on OBC Reservation: मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण मिळायला अडचण येणार नाही. ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यासाठी मध्यप्रदेश धर्तीवर परवानगी देण्यात यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे ठाकरे सरकारच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ओबीसी आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारची पुढची रणनिती कशी असणार आहे यासंदर्भात भुजबळांनी भाष्य केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“निवडणूक आयोग आपलं काम करत असल्याची कल्पना आहे.अजून निवडणूक आयोगाचे काम पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण झाल्यानंतर एक ते दीड महिन्याची प्रक्रिया असून हा पावसाचा हंगाम आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला पावसाळ्यात निवडणूका घेणे कठीण जाणार आहे अशी विनंती केली आहे. दुसरीकडे बांठिया आयोगही अतिशय चांगलं काम करत आहे. त्यांना आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सरकारच्यावतीने मुख्य सचिव व इतरही मंडळी अभिप्रेत असलेला डेटा गावागावातून गोळा करत आहे. मध्य प्रदेशने जे गोळा केले तसेच त्यांनी करावं आणि अधिक चांगलं करता येईल ते करावं. पंधरा – वीस दिवसात आयोगाचं काम संपावं अशी अपेक्षा आहे. ते काम संपल्यावर आपल्यालासुध्दा सुप्रीम कोर्टाकडे आमचं आरक्षण मध्य प्रदेशचा जसा रिपोर्ट आला त्याचधर्तीवर आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासहीत निवडणुक घेण्यासाठी त्याच धर्तीवर परवानगी देण्यात यावी अशी विनंती करणार आहोत. त्यामुळे त्याच धर्तीवर परवानगी मिळायला अडचण येणार नाही,” असं भुजबळ म्हणाले. आज जनता दरबार उपक्रमास भुजबळ उपस्थित राहिले असता माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली.

“आता ज्या जनरल जागा सुटलेल्या त्या मान्य झाल्यानंतर त्यामध्ये ओबीसी आरक्षण येईल. स्री – पुरुष आरक्षण हे नेहमीच असते. पुरुषांचेही आरक्षण नेहमीच आहे. एसटी, एससी आरक्षण नेहमीचं आहे. त्यावेळी ओबीसी आरक्षण असतेच. त्यामुळे तसंच हे आरक्षण होणार. त्यात अवघड काय आहे?,” असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.

“निवृत्त सचिव असतील किंवा मुख्य सचिव असतील त्यांच्यात विचारांचं घर्षण होतं असतंच. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना हवी ती माहिती देत आहोत. सरकार पूर्णपणे सहकार्य करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालत आहेत. त्यामुळे चर्चा करणं म्हणजे फार मोठे मतभेद होणं असं नाही. चर्चा करत असतील. आमच्यात समन्वय आहे. ओबीसींचा डेटा हवा आहे बाकीचा कुणाचा डेटा आवश्यक नाही,” असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

आमचा हक्काचा जीएसटी आहे तो द्या ना आणि तो वेळेवर द्या…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटीवर ट्वीट केले आहे. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी जीएसटीचा परतावा सगळाच द्या ना… तुम्हाला दोन महिन्याचा पगार दिला आणि दोन महिन्याचा पगार रखडला आणि एक महिन्याचा दिला तर एका महिन्याचा पगार देणार नाही का? आमचा हक्काचा जीएसटी आहे तो द्या ना आणि तो वेळेवर द्या. सगळा आमचा जो जीएसटी आहे जो हक्क आहे जो काही वीस – पंचवीस हजार कोटी रुपये गोळा करता तो आम्हाला देऊन टाका ठेवता कशाला?, असा रोखठोक सवालही छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला केला.

केंद्राने जीएसटी सोडून द्यावा आणि आम्हाला सांगावं की, जीएसटी संपली तुम्ही सेल टॅक्स गोळा करा मग प्रश्न येणार नाही, तुमच्याकडे बोट दाखवण्याचा. सेल टॅक्सऐवजी जीएसटी गोळा करता ते पैसे राज्याला मिळाले पाहिजे. राज्यासाठी गोळा होतात. ५० रुपयाचे पेट्रोल सव्वाशे रुपये करायचे आणि दहा रुपये कमी करायचे हा कुठला न्याय. सगळे कपडे काढून घ्यायचे आणि लंगोट द्यायची आणि म्हणायचं हे घ्या.. अरे पण आमचे बाकीचे कपडे द्या ना, असा उपरोधिक टोलाही छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal says thackeray government will take help of sc verdict on obc reservation in madhya pradesh scsg
First published on: 01-06-2022 at 16:42 IST