Chhagan Bhujbal on OBC Reservation : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी ओबीसी मोर्चाला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, “राज्यात कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि अन्यायाविरोधात लढलं पाहिजे. ओबीसींवर हल्ला झाला आणि पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली, दिरंगाई केली तर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन करा.”

दरम्यान, यावेळी भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली. भुजबळ म्हणाले, “मनोज जरांगे मराठा समाजाला आवाहन करतात की ओबीसींना मतदान करू नका. कोणी मराठ्यांना असं आवाहन करत असेल की ओबीसींना मतदान करू नका तर आम्हालाही त्यांच्यासारखंच वागावं लागेल.”

आमची डोकी फुटली तर त्यानंतर जे काही होईल त्याला शासन व पोलीस जबाबदार असतील : भुजबळ

छगन भुजबळ म्हणाले, “मला पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे, कोणीही कायदा हातात घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. कायदा हातात घ्यायला अक्कल लागत नाही. आम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने जात आहोत. परंतु, इतरांनी कायदा हातात घेऊन आमची डोकी फोडली तर त्यांच्यावर कारवाई करा. आमची डोकी फुटत असतील तर त्यानंतर जे काही होईल त्याची जबाबदारी ही पूर्णपणे शासन व पोलिसांची असेल. त्यामुळे जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे ताबडतोब कारवाई झाली पाहिजे.”

…तर पोलीस ठाण्यात जाऊन आंदोलन करा, छगन भुजबळांचा सल्ला

“मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. कुठे आपल्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली नाही तर तुम्ही मला फोन करता, त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करतो. परंतु, तुम्ही देखील एक गोष्ट करा, जर कोणी डोकी फोडली आणि पोलीस ऐकत नसतील तर जा ना १००-२०० जणांना घेऊन… १००-२०० जण मिळून पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना विचारा कारवाई का करत नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, “एखाद्याचं डोकं फुटलं असेल तर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत कारवाई झाली पाहिजे हे पोलिसांना ठणकावून सांगा. पोलीस त्यानंतर गुन्हा कसा दाखल करत नाहीत तेच बघतो. आपण भगवे झेंडे हातात घेतले आहेत. भगवा रंग हे लढवय्याचं निशान आहे. त्यामुळे रडायचं नाही.. लढायचं.”