भाजपाचे खासदार उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला स्वराज्यासाठीच्या लढ्याचा इतिहास आधुनिक पद्धतीने शालेय मुलामुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमास त्यांनी मावळ्यांची शाळा असं नाव दिलं आहे.

उदयनराजे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळ्यांची शाळा या उपक्रमास साताऱ्यातून सुरुवात केली आहे. मावळ्यांची शाळा या उपक्रमात सातारा जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वतंत्र शाळांमधून अधिकचे तास घेऊन आधुनिक आणि रंजक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला स्वराज्यासाठीच्या लढाचा इतिहास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोचवला जाईल. यामध्ये इतर शाळांनीही सहभाग नोंदवावा असे आवाहनही उदयनराजे यांनी केले आहे.

“ब्रिटीशांच्या १५० वर्षांच्या गुलामीतून संघर्ष करून बाहेर आलेला आणि गेली ७५ वर्षे स्वातंत्र्य उपभोगत असलेला आपला भारत देश अनेक क्षेत्रांत प्रगती करत आहे. शिक्षण क्षेत्र देखील त्याला अपवाद नसून या ही क्षेत्रात आमुलाग्र बदल आपण पाहिले आहेत. मात्र अजूनही शाळांमध्ये इतिहास हा केवळ एक विषयापर्यंत मर्यादित राहिला आहे. सनावळ, परप्रांतातील महायुद्धे, राज्यक्रांत्या शिकताना इतिहासातून जी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळायला हवी ती मिळताना दिसत नाही. त्यामुळे शिवछत्रपतींचा खरा इतिहास आधुनिक तसेच रंजक पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा हाच हेतू डाेळ्यासमाेर ठेऊन मावळ्यांची शाळा उपक्रम राबविणार आहाेत,” असं उदयनराजेंनी म्हटलंय.

“या उपक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील निरनिराळ्या शासकीय, निमशासकीय आणि स्वतंत्र शाळांमधून अधिकचे तास घेऊन रटाळ सनावळ्या पाठ करून घेण्याच्या रुक्ष प्रथेला खंड देत, प्रोजेक्टर्स आणि व्हिजुअल ग्राफ़िक्सच्या सहाय्याने आपल्या मातीमध्ये घडलेल्या आणि आपल्या मातीसाठी लढलेल्या स्वराज्य योद्ध्यांच्या शौर्यगाथा शिकविल्या जातील,” असंही उदयनराजे म्हणालेत.

“शालेय अभ्यासक्रम ज्या वीरयोद्ध्यांना विद्यार्थ्यांपासून वंचित ठेवतो त्या स्वराज्य योद्ध्यांना त्यांच्यापर्यंत अधुनिक पद्धतीने पोहोचवताना त्यांच्या चारित्र्यातून काय शिकावे? एकूणच शिवचारित्र्यातून कोणते बोध घ्यावेत ह्याचा अभ्यासपूर्वक विचार करून या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे,” अशी माहिती उदयनराजेंनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हा उपक्रम अस्सल इतिहास प्रेरणादायी पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचवता पोहोचवता शहरातील अनेक हुशार तरूणांना रोजगार देखील देईल. तसेच एक अभिनव आणि आधुनिक शिक्षणपद्धती समोर आणेल की जिच्या यशाने या उपक्रमाला भविष्यात मोठ्या प्रमाणावर राबवणे सोपे जाईल,” असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला आहे.