CM Devendra Fadnavis Ekanth Shinde Ajit Pawar First Cabinet Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनही नेते हे मंत्रालयात आले. त्यांनी मंत्रालयातील महापुरूषांच्या प्रतिमांना वंदन केले. शपथविधी झाल्यानंतर पहिल्या तासातच महायुती सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक मंत्रालयात झाली. शपथविधीनंतर लगेचच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हे सरकार गतिमान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे दाखवून दिले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्या आणि अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास सांगितले. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल, असे ते अधिकाऱ्यांना म्हणाले. आता गती वाढवू आणि अधिक खोलवर जाऊन चांगले निर्णय घेऊन शाश्वत विकास कसा साध्य करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूयात, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा >> “भूमिका बदलली तरी दिशा तीच राहणार”, शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन!
दरम्यान ७ डिसेंबर रोजी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ देणे गरजेचे आहे. त्यासाठी कदाचित हे विशेष अधिवेशन घेतले गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
मंत्रालयात गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे लाडक्या बहिणींनी स्वागत केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यात ते म्हणाले की, मागच्या अडीच वर्षांत घेतलेले निर्णय यापुढेही नेले जातील. सर्व समाजांना घेऊन जाणारे लोकाभिमूख सरकार पुढील काळात पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.