मुंबई: नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्यास सांगण्यात आले असून त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सांगितले.

 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेडच्या शासकीय रुग्णालयात ३५ रुग्णांच्या झालेल्या मृत्यूवर सविस्तर चर्चा करण्यात आली. एवढी मोठी घटना कशी घडली? डॉक्टर नव्हते का? औषधे होती का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाच्या सचिवांना जाब विचारला. त्यावर रुग्णालयात दाखल झालेले बहुतांश रुग्ण गंभीर अवस्थेत दाखल झाले होते.

हेही वाचा >>>नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृतांचा आकडा ३५ वर, अशोक चव्हाणांची माहिती…

मृत्यू झालेल्या बालकांपैकी १० बालके मुदतपूर्व जन्मली होती आणि त्याचे वजनही कमी होते. पाच दिवसांच्या सुट्टीमुळे खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्यात येत नव्हते. त्यामुळे अत्यवस्थ रुग्ण दाखल झाले होते. तसेच काही अपघातातील रुग्ण होते. रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी बैठकीत दिली. त्यावर या प्रकरणात कोणतेही हयगय नको. प्रत्येक रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला, डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे का, याबाबतचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश शिंदे आणि फडणवीस यांनी दिले.

राज्य सरकारने नांदेडची घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आता याप्रकरणी चौकशी होईल आणि पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर दिली.

हेही वाचा >>>शिवाजी पार्कात कोणाचा दसरा मेळावा होणार? शंभूराज देसाई म्हणाले, “आजपर्यंत जसं…”

अधिष्ठातांना बदलण्याच्या हालचाली

’शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील मृत्यूंची मालिका आणि ढिसाळ प्रशासन समोर आल्यानंतर या महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठातांना बदलण्याच्या हालचाली वैद्यकीय शिक्षण विभागात सुरू झाल्या आहेत.  मागील काही महिन्यांपासून अधिष्ठातापदाचा पदभार स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. आर. वाकोडे यांच्याकडे आहे. त्यापूर्वी डॉ. पी. टी. जमदाडे हे प्रभारी अधिष्ठाता होते. त्यांचा कार्यकाळ सुरळीतपणे चालला होता, परंतु गिरीश महाजन यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचा कार्यभार असताना त्यांच्या कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्याने जमदाडे यांना हटवून त्यांच्या जागी वाकोडे यांची नेमणूक होण्याची नेपथ्यरचना केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’या महाविद्यालयाचे नियमित अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकपदाचा पदभार असल्यामुळे नांदेडच्या महाविद्यालयात मागील अनेक वर्षांपासून ‘प्रभारी राज’ चालले आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याचे वरिष्ठ अधिकारी राजीव निवतकर यांच्यासह डॉ. म्हैसेकरही मंगळवारी दुपारी नांदेडमध्ये आले. शासकीय रुग्णालयात जाऊन त्यांनी परिस्थिती जाणून घेतली.  गेल्या दोन दिवसांतील ३५ मृत्यूंमुळे हे महाविद्यालय राज्यभर चर्चेमध्ये आले.  या पार्श्वभूमीवर अधिष्ठातांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, या पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय बुधवारी होईल, असे समजते.