शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) ११ वा स्मृतीदिन आहे. स्मृतीदिनानिमित्त हजारो शिवसैनिक स्मृतीस्थळावर (छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर) त्यांना अभिवादन करण्यास येत असतात. स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येपासूनच येथे शिवसैनिकांची गर्दी होते. त्यानिमित्ताने काल (१६ नोव्हेंबर) सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील नेत्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमल्यामुळे बराच वेळ तिथे तणाव निर्माण झाला होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथं घडलेल्या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, “शिवाजी पार्क येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. कारण बाळासाहेबांचा स्मृतीदिन शांततेत साजरा होतो. महाराष्ट्रातून कार्यकर्ते येतात, नतमस्तक होतात आणि आपआपल्या गावी निघून जातात. कोणत्याही परिस्थितीत संघर्ष नको, स्मृतीदिनाला गालबोट लागू नये म्हणून मी, आमदार, खासदार शांतपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झालो. दर्शन घेतलं आणि आम्ही निघून गेलो. इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी निघत असताना उबाठाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक राडा करणं, घोषणाबाजी करणं, महिलांना धक्काबुक्की करणं ही बाब अतिशय निंदनीय आहे. “

हेही वाचा >> “शरीराने महाराष्ट्राच्या मातीत विसावलेल्या बाळासाहेबांनाच…”, ठाकरे गटाकडून सत्ताधारी लक्ष्य!

नेमकं काय घडलं होतं?

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर दोन्ही शिवसेनांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये बराच वेळ वादावादी व धक्काबुक्की सुरू होती. घोषणाबाजी करत कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांच्या नेत्यांना एकमेकांपासून दूर नेले. बाळासाहेब ठाकरे यांचा आज, १७ नोव्हेंबर रोजी स्मृतीदिन असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्क येथील स्मारकावर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आले. त्यांच्याबरोबर अनेक नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते.

मुख्यमंत्री स्मृतीस्थळावरून परतल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्यासह शिवाजी पार्कवर दाखल झाले. दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. आमदार सदा सरवणकर, प्रवक्ते नरेश म्हस्के व शितल म्हात्रे हे शिंदे गटाचे नेतृत्व करत होते. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना दूर केल्यानंतरही ठाकरे गटाचे कार्यकर्ते बराच काळ तेथे थांबले होते. तर शिंदे गटही स्मृतीस्थळावरून हटण्यास तयार नव्हता. दोन्ही गटांचे कार्यकर्ते बराच वेळ स्मृतीस्थळावर ठाण मांडून बसले होते. या गोंधळात स्मृतीस्थळावर असलेल्या लोखंडी रेलिंगचीही मोडतोड झाल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. घटनेनंतर पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवला असून राज्य राखीव दलाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

हेही वाचा >> बाळासाहेबांच्या स्मारकाजवळ शिवसेनेचे दोन्ही गट भिडले, मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करत संजय राऊतांचा संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुद्धीकरणाच्या प्रयत्नाचा आरोप

दोन्ही गटांच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने या गोंधळात सहभागी असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळाचे गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.