शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा आज ११ वा स्मृतीदिन. या निमित्त ठाकरे गटाने त्यांचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून अनोखी मानवंदना वाहिली आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला आहे. तसंच, “बाळासाहेब, तुम्ही आज नाहीत, पण तुम्हीच घडवलेली गरम रक्ताची पिढी शिवसेना व महाराष्ट्राची कवचकुंडले बनून लढते आहे, ती लढत राहील”, अशीही मानवंदना दिली आहे.
“महाराष्ट्राचे राजकारण हे ‘भयंकर’ या शब्दाला साजेसे झाले आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा घोर काळात आपल्यात नाहीत. देशात लोकशाही, संसद, न्यायालये, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळला जात आहे आणि अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारणारे बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. महाराष्ट्रात ‘जात विरुद्ध जात’ असा आरक्षणाचा भडका उडाला आहे. त्या भडक्यात मराठी माणसांचे ऐक्य होरपळताना दिसत आहे. अशा वेळी जातीभेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा, असे सांगणारे बाळासाहेब आपल्यात नाहीत”, अशी खंत आजच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.
बाळासाहेब आज नाहीत ही वेदना आहे, पण…
“मुंबईचे लचके तोडले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीचे महत्त्व कमी केले जात आहे. महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरात लॉबी पळवत आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानास चूड लावणारे दळभद्री राजकारण सुरू असताना ‘मुंबईस हात लावाल तर मी त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’ अशी गर्जना करून महाराष्ट्रद्वेष्ट्यांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडणारे बाळासाहेब आज नाहीत. मुंबई ‘अदानी’स विकली जात असताना त्या सौद्यात भाजपसह सगळे सामील होत आहेत. त्यांचा सौदा उधळण्यासाठी मुंबई रक्षक बाळासाहेब आपल्यात नाहीत. बाळासाहेब आज नाहीत ही वेदना आहे, पण त्यांनी दिलेला लढण्याचा विचार म्हणजेच धगधगती प्रेरणा आहे. बाळासाहेब फक्त शरीराने आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेल्या भव्य-विशाल शिवसेनेच्या रूपाने ते महाराष्ट्राच्या कणात आणि मनामनात आहेत. शरीराने महाराष्ट्राच्या मातीत विसावलेल्या बाळासाहेबांनाच पळविण्याचा प्रयत्न झाला तरीही गद्दारांच्या छातीवर पाय रोवून बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या रक्षणासाठी उभेच आहेत”, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.
हेही वाचा >> बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी आदित्य ठाकरेंची भावनिक पोस्ट, “आजोबा हा नातवाचा पहिला मित्र..”
शिवसेनेसारख्या बलाढ्य संघटनेचा संस्थापक म्हणून इतिहासात बाळासाहेब अमर झाले
“ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेऊन स्वतःच्या तेजस्वी बुद्धीने व एका कालखंडावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, नेतृत्वाचा, कुंचल्याच्या फटकाऱ्यांचा ठसा उमटविला अशा इतिहास घडविणाऱ्या धुरंधर पुरुषांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गणना केली जाते. शिवसेनेसारख्या बलाढ्य संघटनेचा संस्थापक म्हणून इतिहासात बाळासाहेब अमर झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणास ११ वर्षे झाली. तरीही ते आपल्यात आहेत व आपल्यात हवेत असे वाटणे हेच त्यांचे मोठेपण. जगभरातल्या एकजात सगळ्या डरपोक व गद्दार लोकांना नरेंद्र मोदी यांनी भाजपात घेतले, असे एक परखड विधान प्रियांका गांधी यांनी काल केले. आज बाळासाहेब असते तर सर्व राजकीय मतभेद विसरून ते म्हणाले असते, ”शाब्बास पोरी!” बाळासाहेब परखड आणि स्पष्टवक्ते होते. गुळगुळीत बोलणारे आणि बुळबुळीत विचार करणारे नव्हते”, असं ठाकरे गटाने म्हटलं.
बाळासाहेबांची खरी शिवसेना कशी घट्ट पाय रोवून उभी आहे
“महाराष्ट्रात आज जे बेइमानांचे राज्य सत्तेवर आहे, त्या बेइमान राज्यकर्त्यांच्या ‘खुर्च्या’ त्यांनी रोज भिजवल्या असत्या. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेले महाराष्ट्रद्रोही राजकारण त्यांनी एका फटकाऱ्यात गदागदा हलवून सोडले असते. शरद पवार यांच्या हयातीत बेइमान गटाने राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला. इलेक्शन कमिशनच बेइमान बनले. त्याच इलेक्शन कमिशनने चाळीस आमदार बेइमान झाले या भांडवलावर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उदक शिंदे-मिंधेंच्या हातावर सोडले. अर्थात, आज ही बेइमान मंडळी आणि त्यांना ताकद देणारी दिल्लीतील तथाकथित ‘महाशक्ती’ त्या आनंदात असली तरी उद्या निवडणुका झाल्यानंतर बाळासाहेबांची खरी शिवसेना कशी घट्ट पाय रोवून उभी आहे, हे या बेइमानांच्या लक्षात येईल”, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा >> पक्ष फोडा आणि राज्य करा…! भाजपाच्या रणनीतीला यश येईल का?
या देशाची लोकशाही एका दुष्टचक्रात सापडली आहे
“बाळासाहेब कमालीचे परखड होते. बाळासाहेबांनी व्यक्तिगत व राजकीय फायद्यासाठी तडजोडी केल्या नाहीत. बाळासाहेबांनी ठेचले व सदैव शिवसेनेचे रक्षण केले. बाळासाहेब राजकारणात दीपस्तंभाप्रमाणे उभे राहिले, पण दलदलीत उतरले नाहीत. मतांच्या राजकारणात देशाचा सत्यानाश होऊ नये हे त्यांचे मत मोलाचे आहे. अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक वादात या देशात एक भयानक कोंडी निर्माण झाली आहे. या देशाची लोकशाही एका दुष्टचक्रात सापडली आहे. त्या दुष्टचक्रातून बाहेर पडणे आता शक्य नाही म्हणून एक प्रकारचा निराशावाद दाटला आहे. त्याने चीड निर्माण होते आणि येथे दंगली होतात, असे परखड मत नव्वदच्या दशकात बाळासाहेबांनी मांडले होते. देशात आजही निराशा आहे, दंगली आहेत. निराशेतून आत्मविश्वासाचा जागर निर्माण करण्याचे सामर्थ्य एकमेव बाळासाहेब ठाकरे यांच्यात होते. कारण कोणत्याही कठीण काळात ते निराश झाले नाहीत व हार मानणारे ते नव्हते. देशातील आजचे वातावरण निराश करणारे आहे. शेठ, सावकार, गांडाभाईंची चलती आहे व त्यात सामान्य माणूस गुदमरला आहे. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस देशात अराजक माजेल, असा इशारा बाळासाहेब ठाकरे देऊन गेले. तो इशारा खरा ठरताना दिसत आहे”, असंही ठाकरे गटाने म्हटलं.
देशात अराजकाचा स्फोट होईल, पण
“देशात अराजकाचा स्फोट होईल, पण लोकांना आधार देणारे बाळासाहेब नाहीत. एकेकाळी बाळासाहेब तळमळीने म्हणाले होते, ”ज्यांना देशाचे संविधान व कायदे मान्य नसतील त्यांनी सरळ कराची-लाहोर गाठावे!” बाळासाहेबांचा हा इशारा तेव्हाच्या धर्मांध मुसलमानांसाठी होता. आज आपलेच लोक संविधान व देशाचे कायदे मानायला तयार नाहीत. या घटनाद्रोह्यांना सुतासारखे सरळ करायला बाळासाहेब, तुम्ही आज हवे होता! बाळासाहेब, तुम्ही आज नाहीत, पण तुम्हीच घडवलेली गरम रक्ताची पिढी शिवसेना व महाराष्ट्राची कवचकुंडले बनून लढते आहे, ती लढत राहील. हीच तुम्हाला मानवंदना!”, असंही ठाकरे गटाने म्हटलं.