महाराष्ट्र सुवर्ण जयंती पुनर्निर्माण अभियानांतर्गत वसई-विरार, नंदूरबार, भुसावळ आणि देगलूर या शहरांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ४०३ कोटी ६१ लाख रूपयांचा निधी मंजूर केला. यामुळे या शहरांतील पाणी आणि रस्त्याच्या समस्या दूर होणार आहेत.
वसई विरार महानगरपालिकेतील पाणीपुरवठा योजनेसाठी २६९ कोटी ७९ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सूर्या नदी, मासवण नदी येथे दुरूस्ती करणे शक्य होणार असून, शहराला पुरेसा पाणीपुरवठा करता येईल. या ठिकाणी वॉटर पंप, त्याचप्रमाणे ऑटोमेशन सिस्टीम आणि पाईपलाईन, तसेच पंप हाऊसची कामे हाती घेण्यात येतील. राज्य शासनाने प्रकल्पाच्या किंमतीच्या ५० टक्के म्हणजे १३४.८९ कोटी रूपये एवढ्या हिश्श्याला मान्यता दिली असून, वसई विरार महानगरपालिकेचा हिस्सा तेवढाच राहणार आहे.
नंदूरबार नगरपालिका हद्दीतील रस्ते विकासासाठी १०० कोटी ८२ लाख रूपयांच्या निधीला मान्यता दिली असून, यामध्ये राज्य शासनाचा ८० टक्के आणि नगरपालिकेचा २० टक्के हिस्सा आहे. त्यामुळे राज्य शासनाने ८० कोटी ६६ लाख रूपये मंजूर केले असून, नंदूरबार नगर पालिकेचा हिस्सा २० कोटी १६ लाख असा असणार आहे. यामुळे नंदूरबार शहरातील रस्त्यांची दुरूस्ती, नवीन रस्ते, दुभाजक, पदपाथ, पुल त्याचप्रमाणे पथदिव्यांची कामे मार्गी लागतील.
देगलूर नगर परिषदेसाठी २१ कोटी १ लाख रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली असून प्रकल्प किंमतीच्या ८० टक्के म्हणजे १६ कोटी ८१ लाख रूपयांचा हिस्सा राज्य शासन उचलेल. यात चार कोटी २० लाख रूपये हिस्सा देगलूर नगर पालिकेचा असेल. या मान्यतेमुळे देगलूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
भुसावळ नगरपालिका हद्दीतील रस्ते विकासाच्या कामासाठी ११ कोटी ९९ लाख रूपयांस मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे या शहरातील पायाभूत सुविधा बांधणे शक्य होईल. यासाठी शासनाने प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के म्हणजे ५ कोटी ९९ लाख रूपये एवढ्या हिश्श्यास मान्यता दिली असून, तेवढाच हिस्सा भुसावळ नगरपालिकेचा असणार आहे. या योजनेत भिलवाडे नगर रोड, मामाजी टॉकीज रोड, प्राची रोड, सिंधी कॉलनी रोड यांचे रूंदीकरण आणि बांधकाम होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister sanctioned 403 crore for development work in four cities
First published on: 10-01-2014 at 06:59 IST