अस्वच्छतेमुळे आरोग्यास धोका निर्माण झाल्याची स्थिती निर्माण झाली असताना दिवसागणीक डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. बुधवारी पहाटे डेंग्यूसदृश आजाराने एका बालकाचा मृत्यू झाला असून, रुग्णांची संख्या १४० वर पोहोचली आहे. त्यातील ६८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेने स्वच्छता मोहीम सुरू केली. त्या अंतर्गत पहिल्याच दिवशी सुमारे २२ कर्मचाऱ्यांनी एक तर दांडी मारली किंवा कामावर ते उशिराने आल्याचे आढळले. शहरात डेंग्यूने भयग्रस्त स्थिती निर्माण झाली असताना पालिका कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
ऐन दिवाळीच्या धामधुमीत शहरातील कचरा संकलन व्यवस्था पुरती कोलमडली आहे. घराघरांतील कचरा संकलित करणारी घंटागाडी चार-चार दिवस फिरकत नाही. सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यावरून ओरड झाल्यावर आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. महापौरांनी तातडीने विभागवार स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. तसेच स्वच्छतेच्या कामावर मनसे पदाधिकाऱ्यांकडून बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असेही सूचित केले. ही मोहीम सुरू होत असताना पहाटेच्या सुमारास डेंग्यूसदृश आजाराने एका बालकाचा मृत्यू झाला. कथडा भागातील रहिवासी असलेला फैजम आसिफ  शेख (११) याला सर्दी-तापाच्या काही लक्षणांवरून डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे पाहून त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. तत्पूर्वी, त्याच्या थुंकीचा नमुना पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले, मात्र या संदर्भातील अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी सांगितले. मागील तीन ते चार दिवसांत डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. बुधवारी हा आकडा १४० वर जाऊन पोहोचल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. १३३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील ६८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. एकूण रुग्णांपैकी ५१ रुग्ण महापालिका हद्दीतील, तर १७ रुग्ण शहराबाहेरील असल्याचे सांगण्यात आले. या स्थितीत स्वच्छतेच्या कामात पालिका कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे खुद्द महापौरांच्या पाहणीत स्पष्ट झाले. जवळपास २२ सफाई कर्मचाऱ्यांनी पूर्वसूचना न देता एक तर दांडी मारली अथवा उशिराने ते कामावर दाखल झाले. दांडी बहाद्दरांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.