विक्रमी उत्पादनाने दर निम्म्यावर; कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून सांगलीत आवक; साठवणुकीची सुविधा नसल्याने अडचणीत भर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुकूल वातावरण, चांगला पाऊस त्यातच कर्नाटक, आंध्रमध्ये वारेमाप आलेल्या उत्पादनामुळे यंदाच्या हंगामात ग्राहकांना मिरची चांगली आली असली तरी दर पडल्याने उत्पादक शेतकऱ्याला चांगलाच ठसका लागला आहे. विक्रमी उत्पादनामुळे सांगलीच्या बाजारात पेठेतून दररोज १२० टनांहून अधिक मिरचीची आवक होत असून चार महिन्यांपूर्वीच्या दरापेक्षा सध्याचे दर निम्म्यांवर आले आहेत.

सांगलीच्या बाजारात प्रामुख्याने कर्नाटक, आंध्रमधून मिरचीची आवक होत आहे. यंदाच्या हंगामात निसर्गाच्या अनुकूलतेमुळे उत्पादन जास्त झाल्याने बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणात मिरचीची आवक होत असून यामुळे मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने दर पडले आहेत. सांगलीच्या ठोक बाजारात सौद्यासाठी दररोज १५० टनाहून अधिक मिरची सौद्यासाठी येत असून याच्या साठवणुकीची कोणतीच व्यवस्था बाजारपेठेत उपलब्ध नसल्याने मिळेल त्या दरात मिरचीचा सौदा केला जात आहे.

आंध्रच्या गुंटूरची मिरची बाजारपेठ देशात सर्वाधिक मोठी मानली जात असली तरी सांगलीच्या बाजारामधून कोकणातील ग्राहकासाठी खरेदी होत असते. यामुळे गुंटूरच्या बाजारातून थेट सांगलीसाठी मिरचीची आयात होत आहे. उत्पादन वाढीमुळे गुंटूरच्या बाजारपेठेतून आलेली मिरची ठेवण्यासाठी लागणारी यंत्रणा सांगलीच्या बाजार समितीमध्ये उपलब्ध नाही.

मिरची जास्त काळ हवेशी संपर्कात राहिली तर तिचा रंग, तिखटपणा बदलत असल्याने ठेवण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा आवश्यक ठरते. मात्र सांगलीत असलेली शीतगृहे प्रामुख्याने बेदाण्यासाठी अडली असल्याने आयात मिरचीचा सौदा केल्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. यामुळे याचा परिणाम म्हणून बाजारातील मिरचीचे दर निम्म्यावर आले असल्याचे मिरचीचे ठोक व्यापारी अशोक पाटील यांनी सांगितले.

येथील बाजारामध्ये गुंटूर, संकेश्वर, ज्वाला, तेजा, रेशमपट्टा, इंडो मिरची, ब्याडगी आदी प्रकार उपलब्ध असून या प्रत्येक प्रकाराची चव, रंग, टिकण्याची क्षमता वेगवेगळी आहे. यामुळे दरही वेगवेगळे मोजावे लागतात. स्थानिक पातळीवर ज्वाला मिरचीचे संशोधन सांगलीत झाले असले तरी याची लागवड अलीकडच्या काळात कमी झाली आहे.

ब्याडगी मिरचीचे डिसेंबरअखेर दर िक्वटलचा २२ हजार ते २२,५०० रुपये होते, मात्र आवकवाढ झाल्याने सध्या या मिरचीचा सांगली बाजारातील दर आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. या जातीची मिरची दिसण्यास ओबडधोबड आणि सुरकत्या असलेली असली तरी तिखटाला लाल रंग देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याने याचा वापर स्थानिक पातळीवर घरच्या मिरचीमध्येही करण्यात येतो. मात्र याच जातीप्रमाणे दिसणारी इंडो-मिरचीचा दर याच्या निम्म्यावर असल्याने आठवडी बाजारात याच मिरचीची भेसळ केली जाण्याचा धोकाही आहे. डिसेंबरअखेर १३ ते १३,५०० हजार रुपये िक्वटल असणारा तेजाचा दर सध्या साडेसात हजार रुपयांवर आला आहे. तर ज्वाला, संकेश्वर या जातीचा दर साडेतीन ते पाच हजार रुपये झाला आहे. इंडो-मिरची म्हणजेच २७३ जातीचा दर साडेचार ते पाच हजार रुपये झाला आहे. निम्म्याने दर उतरल्याने आणि गुणवत्ता कमी होत असल्याने मिरची विक्रीसाठी उत्पादक घाई करीत असल्याने हा दर पडला आहे.

’बाजारपेठेत मिरची साठवणुकीसाठी शीतगृह उपलब्ध नसल्याने आवक झालेल्या मिरचीचा सौदा मिळेल त्या दरात करण्याविना पर्याय उरला नसल्याने दर निम्म्यावर आले असल्याचे ठोक व्यापारी सुनील पट्टणशेट्टी यांनी सांगितले. परपेठेतून सांगलीच्या बाजारात रोज मिरची आवक आहे त्या प्रमाणात मिरचीला मागणीही नाही. याचा परिणाम दरावर झाला आहे.

’बेदाणा उत्पादकांचाही माल याच वेळी बाजारात येत असून हाही माल शीतगृहात मोठय़ा प्रमाणात ठेवण्यात येत असल्याने मिरचीसाठी शीतगृहच उपलब्ध नाही. याच वेळी धान्य गोदामेही नवीन मालांनी भरल्याने मिळेल त्या दरात मिरची विक्री केली जात असल्याने दर पडले आहेत. असे जरी असले तरी यंदा पूरक हवामानामुळे दुप्पट उत्पादन झाले हे एक महत्त्वाचे कारण यामागे असल्याचे व्यापारी अशोक पाटील यांनी सांगितले.

’मिरचीपासून तिखट तयार करण्यासाठी महिला वर्ग सर्वसाधारणपणे पाडव्यानंतरचा पंधरवडा निवडतात. कारण यावेळी कडक उन्हामुळे भुकटी चांगली आणि बारीक होते. मिरचीबरोबर धने, जिरे, तीळ, खोबरे, नाकेश्वरी, चटणीचे वेलदोडे, हळद, मीठ, तमालपत्री, काळीमिरी, िहग यांचा वापर सौद्यासाठी केला जातो. एक किलो मिरचीची चटणी करण्यासाठी धने, जिरे, तीळ, खोबरे प्रत्येकी २०० गॅ्रम वापरले जात असून अन्य पदार्थ चवीनुसार वापरले जातात. यापकी केवळ खोबऱ्याचा दर ६० रुपये किलोवरून १०० रुपये झाला आहे. अन्य मसाला दरात फारसा फरक झालेला नसल्याचे केराणा व्यापारी महेश फुटाणे यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chilli prices crashed in market
First published on: 15-04-2017 at 01:47 IST