महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामसक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थाने तळागाळात जाऊन काम केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत मांडलेले विचार भंडारा जिल्ह्यातील आमगाव येथे प्रत्यक्ष आचरणात आणून आमगावला आदर्श गाव केले. देशातील खऱ्या अर्थाने ते प्रथम आदर्शगाव! देशसमृद्धीसाठी ग्रामोद्योगातून ग्रामोद्धाराची विचारधारा मांडताना महाराज म्हणतात : ग्रामोद्धार ही विचारधारा सर्वाची आवडती आहे. परंतु पाहिजे तेवढय़ा प्रमाणात तिकडे लक्ष मात्र कोणाचेच दिसत नाही.. समृद्ध नव्या भारतासाठी खऱ्या अर्थाने आज ग्रामोद्धाराचीच आवश्यकता अधिक आहे.
‘‘ग्रामातील मानवी संबंध हे भारताच्या विकासाचे व जीवनाचे अधिष्ठान आहे. जोपर्यंत खेडय़ाचा सर्वागीण विकास होऊन मानवी संबंध सुधारणार नाहीत तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकणार नाही. माझ्या कल्पनेप्रमाणे मोठमोठय़ा यांत्रिक उत्पादनाचे राष्ट्रीयीकरण करून त्याला पूरक अशा लहान लहान उद्योगधंद्यांचा खेडोपाडी प्रसार झाला पाहिजे, शहरांची भरमसाट वाढ करण्यापेक्षा खेडय़ाच्या विकासाच्या दिशेने उद्योगधंद्याची आखणी केली पाहिजे,’’ असे सांगून महाराज गांधीजींचा संदर्भ देतात. त्यांचा मानस लक्षात घेऊन आजची आपली खेडी उद्योगशील व स्वावलंबी बनविणे आवश्यक झाले आहे. केंद्रीकरणामुळे सारे उद्योग आणि व्यवस्था एका ठिकाणी जमा होतात. परचक्राच्या वरवंटय़ाखाली हे उद्योग नामशेष होण्याची धास्ती राहते. याउलट खेडी छोटय़ा छोटय़ा का होईना उद्योगांनी समृद्ध झाली, घराघरांत उत्पादन सुरू झाले तर कोणत्याही परिस्थितीत देश परास्त होऊ शकत नाही. हे साधण्यासाठी प्रत्येक माणसाला त्याच्या चरितार्थाचे, त्याच्या गरजांच्या पूर्तीचे साधन पुरविले पाहिजे. त्याचे घर हेच त्याचे राज्य झाले पाहिजे व गावाची सामुदायिक कामे सामुदायिक पद्धतीने, सहकार्याने झाली पाहिजेत. माणूस करू शकतो त्या उद्योगाला वैयक्तिक स्थान असूनही सामुदायिक स्थान दिले पाहिजे. ही कल्पना गांधीजींना मान्य होती व यासाठीच त्यांनी ग्रामनिर्माणाचे महत्त्व विशद केले होते. त्यांनी ग्राम-निर्माणाची ही भावना देशभर पसरविली होती. त्या भावनेचा लोक आजही विचार करतील तर भारताचे भाग्य अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. शेतमालावर प्रक्रिया करण्याचे ज्ञान शेतकऱ्यांना नसल्याने, शेतकऱ्यांवर आलेल्या वाईट अवस्थेची कारणे नमूद करून येथे महाराज ग्रामोद्योगातून शेतमालाचे मार्केटिंग कसे करावे याचे सुंदर उदाहरण ग्रामगीतेतून शेतकऱ्यांना देताना म्हणतात :
कच्चा माल मातीच्या भावे।
तो पक्का होता चौपटीने घ्यावे।
मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे।
पिकोवोनीही ते उपाशी।
त्यांच्या सुखाचे मुख्य साधन।
सर्वतोपरी स्वावलंबन।।
राजेश बोबडे
