चिपळूण – देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली आहेत. पण अजूनही काही खेडी अशी आहेत, जिथे लोकांना जगण्यासाठी आणि जगाशी जोडण्यासाठी सर्वात मूलभूत असणारी रस्त्याची सोयही उपलब्ध नाही. चिपळूण तालुक्यातील तिवरे धनगरवाडी ही त्याचे जिवंत उदाहरण आहे.
तालुक्याच्या एका टोकाला तिवरे हे गाव वसलेले आहे. गावापासून डोंगराच्या माथ्यावर ५ किलोमीटर अंतरावर धनगरवाडी वसलेली आहे. गावात धनगर समाजाच्या तीन वाड्या आहेत. तिन्ही वाड्यांमध्ये ८० घरे आहेत. यातील काहींचे अलोरे येथील कोयना प्रकल्पाच्या वसाहतीमध्ये नव्याने बांधलेल्या इमारतीत पुनर्वसन झाले आहे. मात्र शेती आणि जूनी घरे तिथे असल्यामुळे या लोकांनी गाव सोडलेले नाही. कुटूंबातील संख्या वाढल्यानंतर निम्मे अलोरेत गेले तर निम्मे गावातच राहिले.
मात्र या तिन्ही वाड्या जणू मुख्य प्रवाहापासून पूर्णपणे तुटलेल्याच आहेत. इथे पोहोचणे सोपे नाही. कारण इथे जाण्यासाठी अजूनही पक्का रस्ता नाही. आजही वाडीत जाण्यासाठी गावकऱ्यांना तब्बल ५ किलोमीटर पायपीट करावी लागते. तीही पायवाट ज्यात कधी उभे चढ, कधी खोल खळगे, तर कधी दगडांचा माळ. पावसाळ्यात ही वाट चिखलाने भरुन जाते. पाय अडकतात, घसरण्याची भीती सतत असते. अशा डोंगराळ, खडकाळ आणि चिखलमय मार्गावरुन दररोजचा प्रवास हा अक्षरशः जीव धोक्यात घालून करावा लागतो.
वाडीतील परिस्थिती एवढी बिकट आहे की कोणी आजारी पडले तर त्याला खालच्या गावात उपचारासाठी नेणे हा मोठा संघर्ष ठरतो. रुग्णवाहिका तर दूरची गोष्ट, पण दुचाकीने जाण्याचाही रस्ता नाही. त्यामुळे आजारी व्यक्तीला डोलीतून गावात आणावे लागते. वयोवृद्ध आणि गरोदर महिलांची यातून होणारी यातना शब्दांत मांडणंही कठीण आहे. पावसाळ्यात नदीतील पाण्याचा प्रवाह ओलांडून एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनारी जावे लागते. यावेळी केवळ काठीचा आधार असतो. खांद्यावर डोळीची काठी आणि हातात आधाराची काठी घेवून नदी पार करत असताना वाहून जाण्याचा धोका अधिक असतो. शिक्षणासाठी मुलांनाही रोज दीड-दोन तास चालत जावे लागते.
पावसाळ्यात तर ही वाट आणखीनच धोकादायक होते. पाय घसरुन पडण्याची भीती, पावसाचा मारा आणि ओढ्यांना पाणी आल्यावर वाडी तासन्तास तुटूनच जाते. तिवरे भेंदवाडीपासून धनगरवाडीचे अंतर २ कि.मीचे आहे. दोन वाड्यातील वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्तीला सुद्धा डोळीतून नेले जाते. या परिस्थितीमुळे अनेक मुलांचे शिक्षण मधेच थांबते. गावातील ग्रामस्थांना रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थ नाईलाजाने जंगलातील पायवाटांवरुनच ये-जा करतात. या वाटांवर वन्य प्राण्यांचा धोका कायम असतो, पण पर्याय नसल्याने ग्रामस्थ जीव मुठीत धरुन जगत आहेत. काही वर्षांपूर्वी कच्चा रस्ता काढण्यात आला होता, पण तोही देखभालअभावी पुन्हा उद्ध्वस्त झाला. त्यानंतर आजतागायत कोणताही विकासकामाचा हात या वाडीपर्यंत पोहोचलेला नाही. “रस्ता नसल्याने आम्ही बाकी जगापासून वेगळे पडलो आहोत. अशी गावातील ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे.
स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही अशा वाड्यांना रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागतो, ही वस्तुस्थिती देशाच्या विकास कथेला वेगळंच चित्र दाखवते. एका बाजूला अंतराळात झेपावणारा भारत, तर दुसऱ्या बाजूला रस्त्याशिवाय अडकून पडलेला “धनगरवाडी”चा भारत. या दोन चित्रामधील दरी अजूनही भरुन निघालेली नाही. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तिवरे गावच्या धनगरवाडीतील लोक झगडत आहेत. – अजित चव्हाण, ग्रामस्थ तिवरे.