scorecardresearch

“…असं वक्तव्य एखादी ‘सटवी’च करू शकेल”, चित्रा वाघ संतापल्या; नेमकं काय आहे प्रकरण?

“…हा पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का?”

chitra wagh
"…असं वक्तव्य एखादी 'सटवी'च करू शकेल", चित्रा वाघ संतापल्या; नेमकं काय आहे प्रकरण?

जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी गेल्या मंगळवारपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अखेर सोमवारी ( २० मार्च ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. पण, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपातील काही व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडीओवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संपात भाग घेतलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यावरून चित्रा वाघ यांनी ट्वीट करत हा पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.

हेही वाचा : शरद पवारांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीने दादा भुसेंना घेरलं, शंभूराज देसाई आले मदतीला धावून; नेमकं काय घडलं?

ट्वीट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती ठेवली तरी या संपाच्या आडून आपला अजेंडा चालविणारे महाभाग आहेत तरी कोण?? संपातील १ महिला कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर बोलली तिच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे..!”

“मोर्चा… आपल्या प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी संविधानाने दिलेलं हत्यार आहे. पण त्यात हे असं वक्तव्य एखादी “सटवी”च करू शकेल. फेसबुकवर दुसऱ्याची पोस्ट शेअर केली म्हणून मागच्या सरकारने एका मुलीला थेट तुरूंगात पाठवल… इथे तर थेट हातात माईक घेऊन अपशब्द बोलले गेले. हा देशाचे पंतप्रधान व राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान नाही का??,” असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

“पोलिसांनी स्युमोटो अंतर्गत कारवाई करावी… सरकारी यंत्रणेतील हे राजकीय पाताळषडयंत्री एकतर संघटनेने शोधून बाजूला सारावे. नाहीतर राज्याच्या मुख्य सचिवांनी तरी त्यांना घरी बसवावे. आम्ही शोध घेतला तर सापडायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे!,” अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

हेही वाचा : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार? बच्चू कडू म्हणाले…

“देवेंद्र फडणवीस कदाचित मनाचा मोठेपणा दाखवतील पण आम्ही क्षमा करणार नाही आणि खपवून तर मुळीच घेणार नाही..!,” असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 17:26 IST

संबंधित बातम्या