अहिल्यानगर: जिल्हा पोलीस दलाकडून सध्या सुरू असलेले छापेसत्र, वाहतूक व्यवस्थापन, महिला सुरक्षा, सायबर गुन्हेगारी आदींबाबत नागरिकांना क्यूआर कोड व ऑनलाइन पद्धतीने थेट पोलीस अधीक्षकांकडे आपले मत मांडता येणार आहे.
नागरिकांचे मत, अभिप्राय व सूचना मागवण्यासाठी पोलिसांच्या कामगिरीवर गुण नोंदवून कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी क्यूआर कोड आणि लिंकद्वारे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३० जून ते ९ जुलै या कालावधीत ही मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली आहे.
अधीक्षक घार्गे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून विशेष पथक तयार करून अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसह इतर मुद्द्यांवरील पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांचे अभिप्राय मागवण्यात आले आहेत. वाहतूक व्यवस्थापन, महिला सुरक्षा, अमली पदार्थ विरुध्द कारवाई आणि सायबर गुन्हे यावर नागरिकांना अभिप्राय देता येईल. क्यूआर कोड किंवा वेबसाईटच्या लिंकद्वारे मत मांडता येणार आहे.
मत नोंदवताना नाव व फोन नंबर नमूद करण्याची गरज नाही. मात्र, संबंधित पोलीस ठाण्याचे नाव टाकणे अनिवार्य आहे. ५० शब्दांत पोलिसांच्या कामाबाबत अभिप्राय नोंदवावे, पोलिसांच्या कामगिरीसाठी १० पैकी रेटिंग (गुण) द्यावेत, वाहतूक, महिला सुरक्षा, अमली पदार्थ, सायबर गुन्हे या चार विभागांना स्वतंत्र गुण द्यावेत (१ ते १०) असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांचे अभिप्राय गोपनीय ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना चांगली पोलीस सेवा देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. सुधारणा ही निरंतर प्रक्रिया आहे. पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख व उत्तरदायी असावे, या अनुषंगाने नागरिकांचे अभिप्राय नोंदविण्याची मोहीम राबवण्यात येत असल्याचे अधीक्षक घार्गे यांनी म्हटले आहे.