CJI Bhushan Gavai: “जर एखाद्याला कोणत्याही अनुभवाशिवाय न्यायालयात युक्तिवाद करायचा असेल आणि सहा महिन्यातच मर्सिडीज किंवा बीएमडब्लू कार घ्यायची असेल तर त्यांचा हेतू समजून घ्यायला हवा”, असे विधान भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अमरावती मधील दर्यापूर येथील एका कार्यक्रमात केले. शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात सरन्यायाधीश गवई यांनी नवोदित वकिलांना मार्गदर्शन केले.
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विधी शाखेतून नुकतीच पदवी ग्रहण केलेल्या उमेदवारांनाही मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, पदवीधरांनी त्यांच्य डोक्यात प्रतिष्ठेची हवा जाऊ देऊ नये. मी अनेक कनिष्ठ वकिलांना पाहतो, जे त्यांच्या वरिष्ठांना बसायला जागाही देत नाहीत.
न्यायालयात न्यायाधीश आणि वकिल हे दोघेही एकसमान आहेत. तिथली खुर्ची ही लोकांची सेवा करण्यासाठी आहे. खुर्चीशी संबंधित हवा डोक्यात जाऊ देऊ नये, असेही ते पुढे म्हणाले.
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद स्वीकारणार नाही
सरन्यायाधीश गवई यावर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय पद स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले. दर्यापूर, अमरावती आणि नागपूरमध्ये माझा अधिक वेळ घालवेल, असेही गवई यांनी यावेळी सांगितले. सरन्यायाधीश गवई यांचे वडील आर. एस. गवई हे केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल होते. त्यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात आले असताना गवई यांनी निवृत्तीनंतरच्या योजनेबद्दल सांगितले.