scorecardresearch

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासाठी पुढची तारीख! १४ फेब्रुवारीपासून होणार सलग सुनावणी

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासाठी पुढची तारीख! १४ फेब्रुवारीपासून होणार सलग सुनावणी
सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. कारण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल अशी माहिती CJI डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. आज सत्तासंघर्षात काही निकाल येणार की फक्त घटना पीठ बदललं जाणार याची उत्सुकता होती. मात्र आज कुठलीही सुनावणी होणार नाही, ही सुनावणी आता १४ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यापासून हा ठाकरे विरूद्ध शिंदे हा संघर्ष सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. याआधीही अनेकदा तारीख पे तारीख चा अनुभव आला होता. त्यानंतर आज काहीतरी ठोस निर्णय दिला जाईल असं वाटलं होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की या सत्तासंगर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीपासून सलग घेतली जाईल.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे?

१४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी घेतली जाणार आहे. आमचं घटनेवर प्रेम आहे. त्यामुळे कोर्टाने दिलेला निर्णय हा आम्हाला मान्य आहे. सात सदस्यीय घटनापीठ किंवा आत्ता असलेलं पाच सदस्यीय घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. १४ फेब्रुवारीचा दिवस हा व्हॅलेंटाईन डे चा दिवस आहे. त्यामुळे सगळं काही प्रेमाने होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज सुनावणी असल्याने खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब हे सुप्रीम कोर्टात पोहचले होते. त्यामुळे आता ही सुनावणी महिनाभर लांबणीवर पडली आहे.

अग्रलेख : ‘संघटना’ राहिल्याची शिक्षा!

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर काय होणार?

आज दुपारी २ नंतर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना कुणाची याचा निर्णय होणार आहे. शिवसेना आमचीच आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनीही केला आणि उद्धव ठाकरेंनीही केला. त्यानंतर या संबंधीचे पुरावे सादर करा अशी मागणी निवडणूक आयोगाने केली. दोन्ही गटांमधला वाद मिटत नाही तोपर्यंत पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवण्यात आलं. आता यामध्ये काही महत्त्वाचा निर्णय येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

अग्रलेख : शिवसेना विरुद्ध शिवसेना

दीपक केसरकर यांनी काय म्हटलं आहे?

जी प्रक्रिया आहे ती न्यायालयीन आहे. त्याबद्दल फार काही बोलणं योग्य ठरणार नाही. १४ तारखेपासून सलग सुनावणीच होणार आहे त्यामुळे आता उत्तरं सगळ्यांना मिळतील..जे लोक असा निकाल येईल तसा येईल सांगत होते त्यांना आता उत्तर मिळणार आहे. लोक कसं खोटं बोलतात तेदेखील महाराष्ट्राला कळेल असंही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?

शिंदे गटाचे वकील निहार ठाकरे यांनी काय म्हटलं आहे?

शिंदे गटाच्या वकिलांची फौज आज सुप्रीम कोर्टात होती. सात जणांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण गेलं पाहिजे का? यावर सुनावणी झाली त्यामुळे फार विशेष काही घडलं नाही असं शिंदे गटाचे वकील निहार ठाकरे यांनी सांगितलं. १४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी सुरू होईल असं निहार ठाकरे यांनी म्हटलं आहे. जेव्हा अविश्वास प्रस्ताव आलेला असतो तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आमदारांना अपात्र ठरवू शकत नाहीत हाच आमचा मुद्दा आहे असंही निहार ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 11:56 IST

संबंधित बातम्या