छत्रपती संभाजीनगर : शिंदे सेनेच्या उमेदवार गुलजारबी शब्बीर पठाण अर्ज छाननी दरम्यान विरोधी गटातील जनशक्ती विकास आघाडीच्या उमेदवाराने तीन अपत्याच्या मुद्दावरून आक्षेप घेतल्याने दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले होते. निवडणूक अधिकार्‍यांच्या समोरच हा प्रकार सुरू झाला.

परंडा नगरपरिषद परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया मंगळवारी नगरपालिकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निलेश काकडे सहाय्यक अधिकारी सुरेखा कांबळे यांच्या उपस्थितित सुरू होती.

प्रभाग तीन मधील शिंदे सेनेच्या उमेदवार तीन अपत्ये असल्याचा आक्षेप विरोधी गटातील जनशक्ती विकास आघाडीच्या उमेदवाराने आक्षेप घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निर्णय दिल्याने या निर्णयाचे काहीनी टाळ्या वाजवून स्वागत करताच विरोधी गटातील जमाव संतापला.

यातच दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची सुरू झाल्यानंतर नगरपरिषदेच्या बाहेरील दरवाज्यासमोर दोन्ही गटातील समर्थक एकमेकांना भिडले. शिवीगाळ व बाचाबाची सुरू झाल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे पळापळ झाली आणि दोन्ही गटातील लोकांची पोलिसांनी समजूत काढली. या घटनेची माहिती शहरात पसरताच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले हे देखील परंडा येथे दाखल झाले. त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली.