सोलापूर : प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणरायांच्या मूर्ती पर्यावरणाला घातक ठरत असल्याने पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा आग्रह होत आहे. याच पार्श्वभूमीवर इकडे सोलापूर जिल्ह्यात काही गावांमध्ये घरोघरी चक्क मातीच्या गणपतीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा सुरू आहे. बलुतेदारी पद्धतीतून कुंभार समाज मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवून घरोघरी येतात. त्या मोबदल्यात धान्य घेतात. या परंपरेचे स्वागत होत आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप या निमशहरी खेडेगावात आजही कुंभार बांधव गणेशोत्सवासाठी छोट्या आकाराच्या मातीच्या गणपती तयार करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी प्रतिष्ठापनेसाठी मातीच्या श्रींच्या मूर्ती घरोघरी आणून देतात. सोलापूरपासून थोड्याच अंतरावरील विजापूर रस्त्यावर मंद्रूप गावात दरवर्षी गणेशोत्सवात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची वंशपरंपरा आहे. एकीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासन व प्रशासन स्तरावर सातत्याने आवाहन केले जाते. त्या अनुषंगाने पूरक उपक्रमही राबविले जातात. परंतु ग्रामीण भागात सण, उत्सवांची प्रथा-परंपरा पर्यावरणस्नेही आहे, हेच मंद्रूपसारख्या अनेक गावांमधून दिसून येते. अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरूळ व अन्य गावांमध्येही अशाच पद्धतीच्या मातीच्या गणेशमूर्तींची घरोघरी प्रतिष्ठापना करण्याची परंपरा जतन केली जात आहे.

हेही वाचा – पंढरीत ‘मोरया’च्या जयघोषात गणरायाचे स्वागत

हेही वाचा – सोलापुरात श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत, शहरात १३५० मंडळांनी केली श्रींची प्रतिष्ठापना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंद्रूपमध्ये महादेव कुंभार व नागुबाई कुंभार यांच्याकडून गणेशोत्सवाच्या १५ दिवस अगोदरपासून छोट्या आकाराच्या मातीच्या मूर्ती तयार केल्या जातात. उन्हाळ्यामध्ये कुंभार कुटुंबीय मातीचे माठ तयार करून विकतात. मकर संक्रांतीला मातीच्या सुगडी तयार करून घरोघरी पोहोच करतात. तर वेळ अमावस्येला मातीचे कुंभ (मोगा) शेतकऱ्यांना आणून देतात. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी गावातील देशमुख, पाटील, देशपांडे यांच्या घरी मातीपासून तयार केलेल्या गौरीच्या मूर्ती देतात. शनिवारी, गणेश चतुर्थीला श्रींची प्रतिष्ठापना करण्यासाठी कुंभार कुटुंबीयांनी दोनशेपेक्षा अधिक मातीच्या गणरायांच्या मूर्ती तयार करून घरोघरी पोहोच केल्या आहेत. त्या मोबदल्यात या कुंभार कुटुंबीयास गावकरी ज्वारी, गहू, बाजरी अथवा रोख रक्कम देतात. सध्याच्या आधुनिक युगात पैशाच्या व्यवहाराला जास्त महत्त्व असले तरी गावातील पूर्वापार चालत आलेली परंपरा पुढे नेण्यासाठी आपण दरवर्षी गणेशोत्सवात मातीच्या छोट्या आकाराच्या गणपतीच्या मूर्ती सेवाभावी वृत्तीने तयार करून घरोघरी देतो. यात व्यवहार पाहत नाही, अशी भावना नागुबाई कुंभार यांनी व्यक्त केली.