सावंतवाडी : ​आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर तेरा ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ग्रामपंचायतींनी केलेल्या प्रभावी नियोजनामुळे ही मोहीम यशस्वी झाली. या योगदानाबद्दल पंचायत समिती देवगडचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आणि सहायक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी ग्रामपंचायतींचे विशेष कौतुक केले.

​या मोहिमेत मिठमुंबरी, कुणकेश्वर, रामेश्वर, विजयदुर्ग, गिर्ये, तांबळडेग, मिठबाव, हिंदळे, फणसे, पडवणे, पुरळ, कातवण या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश होता. या अभियानासाठी प्रत्येक ठिकाणी पंचायत समितीकडून नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. मिठमुंबरी येथे अप्पर पोलीस अधिकारी नयोमी साटम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब आणि गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी, तर कुणकेश्वर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब आणि गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.

​पावसाळ्यात साचलेला कचरा या अभियानामुळे पूर्णपणे साफ झाला, त्यामुळे हे सर्व समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर दिसू लागले आहेत. या मोहिमेत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी, उमेद अभियानातील बचत गट महिला, शाळा, अंगणवाडी, पोलीस, आरोग्य विभाग, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते. एकूण १४४३ जणांनी या अभियानात भाग घेऊन एकजुटीचे उत्तम उदाहरण दिले.