Devendra Fadnavis On Ahilyanagar Protest: अहिल्यानगर शहरामध्ये आज (२९ सप्टेंबर) सकाळी दोन गटात तणाव निर्माण झाल्याची घटना घडली. यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं असता जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच शहरात वेगवेगळ्या अफवा पसरल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २२ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘या घटनेच्या पाठिमागे कोण आहे? याचा शोध घेऊन कारवाई केली जाईल’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“अहिल्यानगर शहरात घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती अद्याप माझ्याकडे आलेली नाही. कारण मी प्रवासात होतो. मात्र, प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे. मी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर यावर सविस्तर बोलेन. पण मला असं वाटतं की, अलिकडच्या काळात एक काहीतरी प्रयत्न होतोय, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे बोर्ड लावायचे आणि येथील सामाजिक स्वास्थ बिघडवायचं. मात्र, या पाठिमागे कोण आहे? याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल आणि आम्ही हा शोध घेऊन कारवाई करू”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“जाणीवपूर्वक अशा घटना घडत आहेत का? कारण ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न झाला होता. तशाच प्रकारचा आता काही प्रयत्न होतोय का? याकडे लक्ष द्यावं लागेल. यामागे काही षडयंत्र आहे का? हे पाहावं लागेल. अशा प्रकारे लोकांमध्ये तणाव निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

नेमकं काय घटना घडली?

अहिल्यानगर शहरात सोमवारी सकाळी दोन गटात तणावाची घटना घडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना दोनदा लाठीमार करावा लागला. दरम्यान शहरात विविध अफवा पसरल्याने तणावाचे वातावरण होते. बाजारपेठा बंद होत्या. शहरात ठिकठिकाणी गटागटांनी दोन्ही बाजूचे जमाव चर्चा करत थांबून होते. रास्ता रोको, दगडफेक करणाऱ्या २२ जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रानिमित्त शहरात दुर्गादौडचे आयोजन करण्यात आले होते.

ही दौड शहराच्या मध्यवर्ती माळीवाडा भागातून जाणार होती. त्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती. त्यावरून दौड नियोजन केले होते. ही रांगोळी आक्षेपार्ह असल्याची तक्रार करत माळीवाडा भागात जमाव जमला. या जमावाने आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान कोतवाली पोलिसांनी रांगोळी काढणाऱ्या एका जणास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्या पाठोपाठ जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला. विरुद्ध बाजूचा जमावही तेथे आला. दोन्ही बाजूचा जमाव समोरासमोर आला घोषणाबाजी करू लागला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

लाठीमार झाल्याचा निषेध करण्यासाठी एका गटाचा जमाव कोठला भागात जमा झाला त्याने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलन बराच काळ चालल्याने दगडफेकीला सुरुवात झाली. त्यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी पुन्हा लाठीमार केला. त्यानंतर पळापळ सुरू झाली. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली.