Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी विदर्भाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील विविध राजकीय घडामोडींबाबत प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीस यांनी अगदी मनमोकळेपणाने दिले. याच मुलाखतीच्या रॅपीड फायर राऊंडमध्ये देवेंद्र फडणवीस यांना काही भन्नाट प्रश्न विचारण्यात आले असता त्यावर त्यांनीही आपल्या शैलित ‘राजकीय’ उत्तरं दिली. यावेळी ठाम आणि कठोर राजकारणी कोण? नरेंद्र मोदी की अमित शाह? असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर देवेंद्र फडणवीस यांनी अगदी सूचक उत्तर दिलं.

कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह?

“मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कठोर पेक्षा अनुशासित राजकारणी आहेत, म्हणजे त्यांनी जीवनात जो मार्ग स्वीकारला त्या मार्गावरून मग कितीही अडचणी आल्या तरी बाजूला व्हायचंच नाही. हे अनुशासन फार कठीण आहे. आता मला विचारलं तर माझ्यात त्यातील १० टक्केही अनुशासन नाही. त्यामुळे त्यांना कठोर म्हणता येणार नाही. तसेच अमित शाह हे असे आहेत की त्यांना जर आपण असं म्हटलं की एखादा राजकीय दृष्टीने सोयीचा निर्णय करायचा आहे, तर सोयीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार नाहीत, पण अमित शाह घेणार. त्यामुळे आपण अमित शाह यांना पटवून सोईचा निर्णय घेऊ शकतो”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”

अजित पवार की एकनाथ शिंदे?

मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार की एकनाथ शिंदे? असा प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी म्हटलं की, “माझ्यापुरतं विचारलं तर माझे दोघांशी अतिशय चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी माझी जुनी मैत्री आहे. तसेच अजित पवार यांच्यामध्ये एक राजकीय परिपक्तवता असल्यामुळे त्यांचे आणि माझे सूर मोठ्या प्रमाणात जुळतात”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही आपण आणली पाहिजे. सर्वसामान्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा अधिक सकारात्मक, आश्वासक झाला पाहिजे यादृष्टीने मी आता मुख्यमंत्री झाल्यानंतर अगोदर हे जाहीर केले आहे . कोणत्याही खोट्या आरोपातून केलेल्या नकारात्मक वातावरणाला आता समाज मान्यता देत नाही हे या निवडणुकीतून सिद्ध झालं आहे. एका दृष्टीने कलुषित झालेल्या राजकारणाला लोकांनीच शुद्ध करण्याकरीता घेतलेला हा पुढाकार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राजकारणात कोणीही कायमचे शत्रू नसतात. राजकारणात काहीही होऊ शकते. सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही सायंकाळी शपथविधी ठेवला असं एका प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी सांगितल्यावर सभागृहात हशा पिकला.