Devendra Fadnavis called Uddhav Thackeray Sharad Pawar : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केला होता. मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत, आपल्या राज्याचे राज्यपाल आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी समर्थन द्यावं अशी विनंती मी त्यांना केली.

उद्धव ठाकरेंनी सांगितलं आम्ही सगळ्यांशी चर्चा करू. शरद पवारांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर जावे लागेल. पण एक कर्तव्य म्हणून आणि राज्यातील एक उमेदवार आहे म्हणून मी त्यांना फोन केला होता, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या भेटीबाबत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीमाहिती सांगितली आहे. फडणवीस म्हणाले की, “राज ठाकरे यांनी माझी भेट घेतली. त्यांनी ट्रॅफिकच्या संदर्भात मला काही सूचना केल्या आहेत. राज ठाकरेंनी दिलेल्या सूचनांचं मी स्वागत करतो. कारण अशा प्रकारे ट्रॅफिकच्या संदर्भात कोणी सूचना करत असेल तर त्यांचं स्वागत आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जे पक्ष फोडले त्याच पक्षांकडे मत का मागता? – संजय राऊत

दरम्यान विरोधकांकडे समर्थन मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर राऊतांनी टीका केली आहे. “तुम्ही जे पक्ष फोडले त्याच पक्षांकडे तुम्ही मत मागत आहात. हे फक्त आमच्याकडे नाही तर संपू्र्ण देशभरात अशा प्रकारे मते मागितली जात आहेत. आपल्याकडे बहुमत आहे असं तुम्ही म्हणता मग मते मागण्याची गरज नाही. तुम्हाला आमच्याकडे मते मागण्याचा काय अधिकार आहे?”, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला सुनावले आहे.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

जगदीप धनखड यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास दोन वर्षे बाकी असताना त्यांनी पद सोडले. त्यानंतर एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार म्हणून उभे केले. ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत एनडीएचे ७८१ सदस्यीय मंडळात ४२२ खासदार आहेत, त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. असे असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एनडीएबाहेरील पक्षांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी संपर्क मोहीम सोपविण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केले होते.