Mira Bhayandar MNS Morcha : ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर शहरात मराठी बोलण्यावरून झालेल्या वादाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काही दिवसांपूर्वीच व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवत मोर्चा काढून आंदोलन केलं होतं. त्यानंतर आज (८ जुलै) मनसेच्यावतीने मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र, मनसेच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच मनसेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनसेचे पदाधिकारी मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. त्यामुळे मिरा भाईंदरमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, मनसेच्या मिरा भाईंदरमधील मोर्चाला परवानगी का देण्यात आली नाही? याचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक मोर्चाचा मार्ग संघर्ष निर्माण होईल अशा पद्धतीने पाहिजे होता, त्यामुळे मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मनसेच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सरकारने मनसेच्या मोर्चाला परवानगी का दिलेली नाही? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “मी मनसेच्या मोर्चाबाबत आताच पोलीस आयुक्तांना विचारलं की मोर्चाला परवानगी का देण्यात आलेली नाही. कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो. पण मला पोलीस आयुक्तांनी मनसेच्या मोर्चाबाबत सांगितलं की, मनसेच्या मोर्चाच्या मार्गाबाबत चर्चा सुरु होती. तेव्हा मनसेचे नेते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा मार्ग मोर्चासाठी मागत होते की ज्यामधून संघर्ष निर्माण होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“तसेच पोलिसांचं म्हणणं असंही होतं की काही लोकांच्या बाबतीत त्यांच्याकडे माहिती आली होती की काही वेगळा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी सांगितलं की, मोर्चासाठी जो नेहमीचा मार्ग असतो, त्या मार्गावरून तुम्ही मोर्चा काढा. मात्र, तुम्ही ज्या मार्गावरून मोर्चाची परवानगी मागत आहात, त्या मार्गावरून मोर्चा काढू नका. मात्र, मनसेच्या नेत्यांनी त्याच मार्गावरून मोर्चा काढणार असं सांगितलं आणि पोलिसांनी दिलेला मार्ग मनसेच्या नेत्यांनी नाकारला. त्यामुळे पोलिसांनी त्या मार्गावरून मोर्चा काढण्याची परवानगी नाकारली, असं पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘…तर ते योग्य नाही’ : देवेंद्र फडणवीस

“तसेच मनसे काय? कोणत्याही पक्षाला मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर परवानगी मिळेल. मात्र, आम्हाला ह्याच मार्गावर मोर्चा काढायाचा? त्याच मार्गावर मोर्चा काढायचा, ही मागणी करत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा प्रकारचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असेल तर ते योग्य नाही. शेवटी आपल्याला एका राज्यात राहायचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

मनसेच्या मीरा-भाईंदरमधील मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही पक्षाकडून मोर्चासाठी तयारी केली जात असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु करण्यात आली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.