Devendra Fadnavis On NCP MP Sunetra Pawar at RSS Program : राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’शी संबंधित राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याने वाद निर्माण झाला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातील विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बंदी असलेली संघटना आहे का असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांना उत्तर दिले आहे. “आरएसएस काय बॅन्ड आर्गनायजेशन (बंदी असलेली संघटना) आहे? मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला स्वयंसेवक असण्याचा अभिमान आहे. मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी राष्ट्रवाद शिकवला आहे. मला नेहमी समाजातील प्रत्येक व्यक्तीलाबरोबर घेऊन आपल्याला देशाचे कल्याण करायचे आहे हेच शिकवले आहे. त्यामुळे समजा जर कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेलं तर त्याच्यासाठी एवढं आकांडतांडव करण्याची काय गरज आहे?” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

नेमका विषय काय?

खासदार व अभिनेत्री कंगणा रानौत यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी संघाची महिला शाखा असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली होती. भगवा ध्वज, डॉ. हेडगेवार, गोळवलकर आणि भारतमातेच्या तसबिरी असलेल्या या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतानाचा फोटो समोर आला होता.

सुनेत्रा पवार यांच्या संघाच्या बैठकीला उपस्थिती लावल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी टीका केली होती। आपला पक्ष पुरोगामी असल्याचे सांगायचे आणि प्रत्यक्षात रा. स्व. संघाच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची हा दुटप्पीपणा आहे. मंडल आयोग लागू केल्यावर कमंडल यात्रा काय होती, हा प्रश्न त्यांनी सरसंघचालकांना विचारायला हवा होता, असे आमदार रोहीत पवार म्हणाले होते.

सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण

दरम्यान टीका होत असताना सुनेत्रा पवार यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी एक्सवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे.

“एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेची खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दांत माझी भूमिका मांडली”, असं सुनेत्रा पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.