CM Devendra Fadnavis On Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने मध्यरात्री ‘एअर स्ट्राईक’ करत दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या ‘एअर स्ट्राईक’मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीतील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारताने केलेल्या या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मसूद अजहरच्या कुटुंबाचा देखील खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान, भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर विविध क्षेत्रामधून प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य करत हा नवीन भारत, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने ‘एअर स्ट्राईक’ करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीतील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ज्या प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या माध्यमातून होत होता. तसेच पहलगामध्ये ज्या प्रकारे आमच्या बांधवांना मारण्यात आलं. त्यामधून संपूर्ण भारताच्या मनात संताप निर्माण झाला होता. मात्र, आज संपूर्ण भारतीयांना समाधान वाटलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच सांगितलं होतं की पहलगामच्या घटनेचं प्रत्युत्तर दिलं जाईल. आम्ही अशा प्रकारची घटना सहन करणार नाही, असं मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं. त्यानंतर अतिशय सबळ अशा प्रकारचं उत्तर भारतीय लष्कराने दिलं आहे. दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाई भारताने केली आहे. हा नवीन भारत आहे. हा नवा भारत अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही. हे भारताने दाखवून दिलं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गेल्या १३ ते १४ दिवसांत जगातील अनेक देशांबरोबर संपर्क करून पहलगामच्या घटनेत पाकिस्तान कसा दोषी आहे? याचे पुरावे भारताने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांनी विविध देशांबरोबर चर्चा करून पाकिस्तानने कशा प्रकारे हल्ला केला हे जगाला देखील सांगितलं आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जग भारताबरोबर आहे. आपण जर पाहिलं तर पाकिस्तानच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत सगळीकडील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याचं काम भारतीय लष्कराने केलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.